कोल्हापूर : जोतिबा यात्रा, अंबाबाईचा रथोत्सव व सलग सुट्यांमुळे अंबाबाई दर्शनासाठी भाविक व पर्यटकांची गर्दी झाली आहे. शुक्रवारी दर्शनाची रांग भवानी मंडपापर्यंत लागली होती. तळपत्या उन्हातही भाविकांनी रांगेत उभे राहून अंबाबाईचे दर्शन घेतले.जोतिबा चैत्र यात्रेमुळे कोल्हापुरात जिल्ह्यासह राज्य व परराज्यांतूनही भाविक आले आहेत. जोतिबा दर्शनाला जाताना व परत येताना अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असल्याने शुक्रवारी दिवसभर मंदिराच्या परिसरात प्रचंड गर्दी होती. भाविकांची रांग भवानी मंडपापर्यंत लागली होती. तळपत्या उन्हात रांगेत उभे राहून भाविक देवीचे दर्शन घेत होते. त्याचबरोबर गुरुवारी (दि. २) महावीर जयंती, शुक्रवारी गुड फ्रायडे, आज, शनिवारची रजा व उद्या, रविवारची सुटी अशा सलग सुट्यांचा बेत आखून पर्यटकही कोल्हापुरात दाखल झाले आहेत. अंबाबाईच्या रथोत्सवासाठीही राज्यभरातील भाविक सहकुटुंब कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यामुळेही अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. सर्वांना व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी रांगेचे नियोजन करण्यात आले होते. इतरवेळी मंदिराच्या आवारात दिसणारी ही रांग भवानी मंडपापर्यंत गेली होती. गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुट्यांमुळे अशीच गर्दी पुढे दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी
By admin | Updated: April 3, 2015 23:55 IST