आजरा :
अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या व घराच्या पडझडीचे पंचनामे वस्तुस्थितीदर्शक करा, नुकसान भरपाई जुन्याऐवजी प्रचलित दराप्रमाणे मिळावी, अशा मागणीचा ठराव आजरा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती उदयराज पवार होते. जि. प. च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जयवंत शिंपी यांचा सत्कार करण्यात आला.
गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी स्वागत केले. मेंढोली सबस्टेशन व उत्तूरमध्ये रोहित्र वाढविण्याची गरज असल्याचे शिरीष देसाई व सभापती उदय पवार यांनी सांगितले.
एसटीच्या कोल्हापूर गडहिंग्लज व पुणे या ठिकाणच्या बसफेऱ्या सुरू असून, ग्रामीण भागातील बसफेऱ्या अद्याप सुरू नाहीत.
ग्रामीण रुग्णालयात स्टाफ असूनही महिलांची प्रसूती का नाही, रुग्ण आला की रेफर केले जाते, हे बरोबर नाही. महिलांच्या अडचणी होत आहेत. आजरा ग्रामीण रुग्णालयात २५ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करून तालुका क्रीडा संकुलच्या इमारतीत ओपीडी सुरू करावे, असे जि.प.उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांनी सूचविले. उपसभापती वर्षा बागडी यांनी आभार मानले.
चौकट :
प्रस्ताव सादर करा निधी दिला जाईल - उपाध्यक्ष शिंपी
पंधराव्या वित्त आयोगासह व्यक्तिगत लाभाच्या योजनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी जि.प.कडे तातडीने प्रस्ताव सादर करावेत. निधी दिला जाईल. सर्व योजनांचा लाभ सामान्य लोकांना मिळाला पाहिजे, असे सत्काराला उत्तर देताना जि. प. उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांनी सांगितले.