लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात कोणत्या ठिकाणी कडक निर्बंध लावायचे वा सूट द्यायची, याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री व आपत्ती व्यवस्थापन विभाग घेतात. याबाबत इचलकरंजी नगरपालिकेकडून शुक्रवार, ९ जुलैपर्यंत प्रस्तावाची मागणीही झाली नव्हती. परंतु, संकटकाळात मार्ग काढण्याऐवजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर द्वेषातून काहीजण टीका करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.
नगरपालिकेने शहरातील परिस्थिती संदर्भात कोणताही प्रस्ताव शासनाकडे पाठवला नसल्याचे खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीतील बैठकीत दिसून आले. त्यानंतरही पालिकेने प्रस्ताव पाठवला नाही. कोल्हापूर महापालिकेचा प्रस्ताव गेल्याने त्यांना परवानगी मिळाली. असे असताना इचलकरंजीतील काही प्रश्नांबाबत सातत्याने पालकमंत्री पाटील यांना लक्ष्य केले जात आहे. विधानसभेच्या अधिवेशनात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार व आपल्याला संधी मिळणार, म्हणून काहीजण देव पाण्यात ठेवून होते. ज्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत कोणतेही गांभीर्य नाही, त्यांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करु नये. जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी मिळावी, यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील असून, सकारात्मक निर्णय होईल, असे बावचकर यांनी म्हटले आहे.