रवींद्र माने -ढेबेवाडी -शिवाजी विद्यापीठांतर्गत पदवी परीक्षा दिलेल्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांचे निकालच लटकल्याने विद्यार्थी हतबल झाले असून, शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुढील प्रवेशप्रक्रिया थांबल्याने संतप्त विद्यार्थ्यांचे महाविद्यालय प्रशासनाशी खटके उडू लागले आहेत. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे हे निकाल अडकल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कबूल केले असून, लवकरच त्या विद्यार्थ्यांची निकाल प्रक्रिया पूर्ण होईल, असेही स्पष्ट केले. सातारा, सांगली व कोल्हापूर असे तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले शिवाजी विद्यापीठअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधून सन २०१४-१५ मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान अशा तिन्ही शाखांमधून २ लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तिन्ही शाखांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले. विद्यापीठाने निकाल प्रक्रियेचे काम ‘एमकेसीएल’या कंपनीकडे ठेक्याने दिले आहे. विद्यापीठानेही माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेत सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल इंटरनेटद्वारे संबंधित वेबसाईटवर प्रसारित केले. मात्र, यामध्ये कमालीच्या त्रुटी आढळून आल्या असून, बहुतेक विद्यार्थ्यांचे निकालच गायब झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लटकले आहेत, अशा विद्यार्थ्यांना धक्का बसल्याने त्यांनी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयांकडे धाव घेतली. महाविद्यालयांनीही याबाबत विद्यापीठाच्या शिक्षण विभाग, परीक्षा मंडळाशी संपर्क साधला. जवळपास एक महिन्यापासून हा पाठशिवणीचा खेळ सुरू असून, विद्यार्थ्यांची कोल्हापूर वारी सुरू आहे.या संपूर्ण प्रक्रियेमुळे चार हजार विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षण प्रवेशाला खो बसल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. विद्यापीठाने ‘एमकेसीएल’कडे चेंडू ढकलल्याने या विद्यार्थ्यांना कोणी न्याय देईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यापीठांतर्गत घेणाऱ्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांच्या निकालाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये काहीअंशी विद्यार्थी, महाविद्यालयेही जबाबदार आहेत. त्यातच डेटा मायग्रेशन आणि इंटरनेट प्रॉब्लेम याही बाबींचा समावेश आहे. तरी सुद्धा प्राप्त अर्जातील विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पुणे येथे सुरू असून, लवकरच त्यांना निकाल प्राप्त होतील. - महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरवीस दिवसांपासून ‘नेट’च बंद निकालाच्या कामासाठी इंटरनेट अत्यावश्यक असताना सुध्दा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील ‘इंटरनेट’ वीस दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विद्यापीठाच्याच माहिती तंत्रज्ञान विभाग कोमात गेला तर शिक्षणाचे काय? असा प्रश्नही सध्या निर्माण झाला आहे.
चार हजार विद्यार्थ्यांवर संकट
By admin | Updated: July 10, 2015 22:09 IST