कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार मृत्यूच्या बनावप्रकरणी कागदपत्रे तयार झाली असून, त्यामध्ये खासगी सावकारीप्रकरणी नगरसेवकांसह काहींचा सहभाग आढळल्यास त्यांना आज, गुरुवारी रेकॉर्डवर आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना सूचना देणार आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याने स्वत:च्या खुनाचा बनाव करून विम्याच्या ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने सेंट्रिंग कामगार रमेश नाईक (रा. गडहिंग्लज) याचा खून केला. या खुनाच्या संशयावरून पोलिसांनी अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांना अटक केली आहे. दरम्यान, खासगी सावकारी व बँकांच्या तगाद्यामुळे त्याने एका निष्पापाचा भाऊ विनायक पवार याच्या मदतीने खून केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी विनायक पवार याच्या सानेगुरुजी वसाहतमधील बंगल्यावर छापा टाकून तेथील झडती घेतली. यामध्ये पोलिसांच्या हाती संशयास्पद कागदपत्रे मिळाली आहेत. पोलिसांनी केलेली चौकशी आणि बंगल्यातील घेतलेल्या झडतीतील काही संशयास्पद बाबींवरून या प्रकरणाची कागदपत्रे तयार केली आहेत. ही कागदपत्रे आपल्याकडे आली असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी दिली. आपल्याकडे आलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानुसार खासगी सावकरीप्रकरणी महानगरपालिकेतील काही नगरसेवकांचा सहभाग आढळल्यास त्यांना तातडीने रेकॉर्डवर घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत आजच पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी चर्चा करून त्यांना सूचना देण्यात येणार आहेत. याशिवाय त्या नगरसेवकांना तातडीने चौकशीसाठीही बोलाविण्यात येणार आहे, अशी माहिती वर्मा यांनी दिली. ते म्हणाले, या गुन्ह्यात कितीही मोठ्या लोकप्रतिनिधींचा अगर कोणाचाही सहभाग आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही; पण हे गुन्हे दाखल करताना रमेश नाईक याच्या खून प्रकरणातील तपास कामाला कोणतीही बाधा येणार नाही याचीही दक्षता घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अमोल पवार याच्या पत्नीचे जबाबास असहकार्यकोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याने स्वत:च्या केलेल्या मृत्यूच्या बनावप्रकरणी त्याची पत्नी रोहिणी पवार हिला बुधवारी पोलिस ठाण्यात जबाब घेण्यासाठी बोलाविले होते; पण ती बैचेन असल्याने तिचा जबाब होऊ शकला नाही. दरम्यान, रमेश नाईक याच्या खूनप्रकरणी पवार बंधूंनी उपलब्ध केलेल्या डिझेलप्रकरणी पोलिसांच्या एका पथकाने बुधवारी गारगोटी येथे एका पेट्रोल पंपावर जाऊन चौकशी केली. विम्याच्या ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने सेंट्रिंग कामगार रमेश नाईक (रा. गडहिंग्लज) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमोल जयवंत पवार व त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांना अटक केलेली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणने तपासासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. मंगळवारी दुपारी पोलिसांच्या पथकाने विनायक पवार याच्या सानेगुरुजी वसाहतमधील बंगल्याची झडती घेतली. याशिवाय मंगळवारी रात्रीच अमोल पवार याची पत्नी रोहिणी पवार हिचाही जबाब घेण्याचा प्रयत्न केला; पण त्या जबाबावेळी ती बैचेन असल्याने तिचा जबाब अर्धवटच राहिला. दरम्यान, बुधवारी सकाळी पुन्हा रोहिणीला जबाबासाठी बोलाविण्यात आले होते; पण तिने जबाबासाठी अपेक्षित सहकार्य न केल्याने पोलिसांनी तिचा जबाब नोंदविलाच नाही. दरम्यान, रमेश नाईक याच्यावर डिझेल ओतून पेटवून त्याची हत्या करण्यासाठी संशयित आरोपी पवार बंधूंनी कॅनमधून आणलेले डिझेल ज्या ठिकाणाहून आणले, त्या गारगोटी येथील पट्रोल पंपाला पोलिसांच्या एका पथकाने बुधवारी दुपारी भेट दिली. नगरसेवकांची आज चौकशी शक्यपोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी या तपासकामाबाबत बुधवारी रात्री पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. त्यानुसार आज, गुरुवारी खासगी सावकारीप्रकरणी नगरसेवकांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना आजच चौकशीलाही बोलाविण्यात येणार आहे.
नगरसेवकांचा सहभाग आढळल्यास गुन्हे
By admin | Updated: March 17, 2016 01:01 IST