पेठवडगाव : येथे संचारबंदीचा भंग करणाऱ्या दहा व्यावसायिकांवर पोलीस व पालिकेने धडक कारवाई केली. ‘लोकमत’ने ‘संचारबंदी नावालाच’ असे वृत्त प्रसिद्ध करून शहरातील परिस्थितीकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर शहरात कडक कारवाई करण्यात आली. रविवारी शहरात कडकडीत बंद असून, विनाकारण रस्त्यावर फिरतीला पायबंद बसला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेला सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
वडगाव पालिका व पोलीस प्रशासनाने साडेअकरा वाजता धान्य लाइन, वाणी पेठ, पद्मारोड आदी ठिकाणी कारवाई केली. यावेळी दहा व्यावसायिकांवर संचारबंदीचा भंग केला म्हणून गुन्हा नोंद केला. कारवाई पोलीस उपनिरीक्षक नासीर खान, पोलीस नाईक विशाल हुबाळे, दादा माने, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण यांच्या पथकाने केली. या पथकाने अनिल बापूसाहेब गाताडे, सुजित लालासाहेब देसाई, धनाजी रामदास माने, महादेव तातोबा पिसे, रामचंद्र गणपती पांढरपट्टे, सौफिया अब्दुलगनी मोमीन, रमेश रामचंद्र बुढ्ढे, अप्पासाहेब बाळासाहेब बुढ्ढे, अभिनंदन राजाराम चौगुले, सदानंद रंगराव कारंडे यांच्यासह विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या मोटारसायकलस्वारांवर गुन्हा नोंद केला आहे.
पेठवडगाव : येथील पद्मारोड, धान्य लाइन परिसरात कोरोनाच्या संचारबंदीत विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करताना पोलीस उपनिरीक्षक नासीर खान.