कोल्हापूर : शहरातील पश्चिमेकडील उपनगरातील हाॅटेलमध्ये घुसून महिलेस मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी दोघा जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये प्रशांत कारेकर, निशांत कारेकर (रा. कोल्हापूर) या संशयितांचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी महिला व संशयित एकमेकांना ओळखतात. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आपल्या जावायाच्या हाॅटेलमध्ये फिर्यादीच्या मुलास संशंयितानी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत हाॅटेलचे साहित्य विस्कटले. मुलाचा फोन आल्यानंतर फिर्यादी महिला हाॅटेलमध्ये गेल्या. त्या ठिकाणी संशयित प्रशांतने फिर्यादीला पाहून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यादरम्यान हाताला धरून ओढण्याचा प्रयत्नही केला, अशी फिर्याद संबंधित महिलेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल केला.