कोल्हापूर : विवाहितेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल एकावर विनयभंगाचा गुन्हा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद केला. असिफ मुल्ला (रा, संभाजीनगर, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. तो जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरता नेमणुकीस असून जीएसटी ऑफिसमध्ये मूळचा नोकरीस आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित आरोपी असिफ मुल्ला हा पीडित महिलेस वारंवार फोन करून अथवा अश्लील मेसेज पाठवून त्रास देत होता. पीडित विवाहित महिला घरी एकटी असल्याचे पाहून त्याने तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच याबाबत घरच्यांना सांगितल्यास मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडितेने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली, त्यानुसार संशयित मुल्ला याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास हे.कॉ. राजाराम पाटील हे करत आहेत.