दत्तवाड : नऊ महिन्याच्या लॉकडाऊननंतर दुबई येथे आयपीएल क्रिकेट सामने झाले. त्याच धर्तीवर गावागावात गावच्या नावाने तर राजकीय नेत्यांच्या नावाने प्रिमियर लीगचे सामने रंगत आहेत. त्यामुळे मैदानावर एकच जल्लोष सुरू आहे.
मार्चपासून लॉकडाऊनमुळे मैदाने, रस्ते ओस पडली होती. लॉकडाऊन तीननंतर एकेक गोष्टीत शिथिलता येत गेली. भारत सरकारने परवानगी नाकारल्यानंतर आयपीएल सामने हे दुबई येथे पार पडले. तर भारतात मैदाने खुली झाल्यावर त्याच धर्तीवर गावागावात क्रिकेट सामने होत आहेत. यामुळे मैदानात क्रिकेटचा जल्लोष पुन्हा पहायला मिळत असून २०२० च्या शेवटच्या महिन्यात तरुणांना खेळण्याचे समाधान मिळत आहे. विद्यार्थ्यांनाही मैदानावर खेळण्यास वाव मिळत आहे. २०२० हे कोरोना वर्ष झाले. त्यामुळे लांबलेल्या निवडणुका या २०२१ मध्ये होणार, हे गृहित धरुन अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते युवकांना एकत्र करण्यासाठी या क्रिकेटचा वापर करत आहेत. अनेक ठिकाणी गावाच्या नावाने तर राजकीय नेत्यांच्या नावाने क्रिकेटचे सामने भरविले जात आहेत. यामुळे गावातील मैदानावर क्रिकेटची रंगत व लढत वाढत आहे.
आगामी काळात ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका असल्याने राजकीय पक्षांना युवकांची गरज आहे. याचा विचार करुनच अनेक राजकीय पक्ष व नेते या क्रिकेट सामन्यासाठी मदत करत आहेत.