कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची झालेली पीछेहाट, परिवहन सभापतिपदावरून झालेल्या न्यायिक वादाची चर्चा संपेपर्यंत महापौर तृप्ती माळवी यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप तर विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव बेटिंग प्रकरण, अशा सलगच्या घटनाक्रमांमुळे गेल्या तीन महिन्यांत सत्ताधारी नगरसेवकांचा मनपातील राबता कमी झाला आहे. दररोज संध्याकाळी विठ्ठल रामजी चौकात नगरसेवकांची गर्दी कमी झाल्याने ‘इतना सन्नाटा क्यूँ हैं भाई ?’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.विधानसभेपर्यंत महापालिकेचा चौक नगरसेवकांच्या गर्दीने फुललेला असायचा. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला अन् काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे अवसान गळाले. त्यानंतर कित्येक दिवस नगरसेवकांनी कामाव्यतिरिक्त पालिकेत येणेच बंद केले. काही मोजके चेहरे पुन्हा जमू लागले.दरम्यान, परिवहन व स्थायी समिती सभापती निवडणुकीवरून जनसुराज्य आघाडी व काँग्रेस-राष्ट्रवादी अशी दरी निर्माण झाली. स्थायी निवडणूक निर्वेधपणे पार पडली. मात्र, परिवहन सभापती निवडणूक स्वीकृत नगरसेवकांवरून न्यायिक वादात अडकली. या गृहकलहामुळे नरगसेवकांनी पुन्हा पालिकेत येणे कमी केले. निवडणूक पार पडल्यानंतर सर्व काही अलबेल झाल्याचे चित्र निर्माण झाले.तोपर्यंत विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव क्रिकेट बेटिंगमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. तोपर्यंत दस्तूरखुद्द महापौर तृप्ती माळवी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्या. भ्रष्टाचाराच्या आरोपात महापौरच अडकल्याने नगरसेवक पुरते हबकले. गेल्या आठ दिवसांत महापालिकेत नगरसेवकांचे दर्शनही दुर्मीळ झाले आहे. राजकीय परिस्थीती दररोज बदलत आहे. त्यात आठ महिन्यांत महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार असल्याने प्रभागात लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरसेवक मनपात कामानिमित्तच येऊन इतर वेळ प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी देत आहे. झालेल्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा भविष्याची चिंता नगरसेवकांना सतावत आहे. त्यामुळे मनपात नगरसेवकांचे येणे कमी झाले आहे. - एक नगरसेवक
नगरसेवकांनी फिरवली महापालिकेकडे पाठ
By admin | Updated: February 7, 2015 00:05 IST