कुरुंदवाड : गतवेळच्या प्रलयकारी महापुराचा अनुभव लक्षात घेता नगरपालिकेने सर्व प्रकारच्या उपाययोजनांची खबरदारी घेतली असून पालिका प्रशासन संभाव्य महापुराच्या संकटाला तोंड देण्यासाठी सतर्क झाले आहे. यासंदर्भात सर्व समावेशक अशी बैठक पुढील आठवड्यात बोलाविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. महापुराचे पाणी ज्या परिसरात येते. त्या ठिकाणच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे नियोजन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच त्यांना दक्ष राहण्याचेही सांगण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुटुंबांना सावध करण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची ध्वनिक्षेपण यंत्रणा बसविण्यात आली आहे. पालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन यांत्रिक बोटी चालविण्याचे तसेच मदतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महापुराच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासनाला मदत व्हावी व बचाव कार्य अधिक जोमाने चालू राहावे आणि नागरिकांना कमी वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे याकरिता वजीर रेस्को फोर्स, पास रेस्कू फोर्स, व्हाइट आर्मी यासह सेवाभावी संस्थांना मदतीचे आवाहन केले असल्याचे मुख्याधिकारी जाधव यांनी सांगितले.