कोरोना संसर्गजन्य रोग असल्याने तोरणादारीची वाट दोन वर्षांपासून बिकट केली आहे.
तुलसी लग्नानंतर लग्नाला सुरुवात होते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त असतात. त्यामुळे लग्नासाठी हे महिने हाऊसफुल्ल असतात. नेमके याच महिन्यात कोरोनाने थैमान घातल्याने त्याचा परिणाम विवाह सोहळ्यांवर झाला आहे. कोरोना बाबत खबरदारी घेण्यासाठी प्रशासनाने लग्न, सभा, सभारंभ यासारखे गर्दी करणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट येण्यापूर्वी काहींनी लग्नाची जय्यत तयारी केली होती. पण आता लाॅकडाऊन जाहीर झाल्याने त्यांच्या लग्नातील हौसेचा हिरमोड झाला. काहींनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या असल्या तरी लाॅकडाऊनच्या तारखा वाढतील तसे लग्न साध्या पद्धतीने का असेना दहा किंवा पंधरा पाहुण्यांच्या उपस्थितीत घरादारात लगीनघाई सुरू आहे. ना बँडबाजा ना वरात, ना मंडप, ना जेवणावळ तर 'चट मंगनी पट शादीला' पसंती मिळत आहे. हौसेला मोल नसले तरी लग्नात होणाऱ्या लाखोंच्या उधळणीला कोरोनाने ब्रेक दिला आहे.