आजरा : आजरा तालुक्यात कोरोनाला रोखण्यासाठी दररोज १ हजार लोकांची रॅपिड अॅन्टिजन व आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाने त्यासाठी ५ पथके तयार केली आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात हॉटस्पॉट व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट जास्त असणाऱ्या गावामध्ये स्वॅबची तपासणी सुरू केली आहे.
तालुक्यात किमान दररोज ४० ते ५० नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. १ एप्रिलपासून तालुक्यात ९०७६ जणांचे कोरोनाचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी ८९७५ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालापैकी २२६१ जण पॉझिटिव्ह असून १८३५ नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर ३५९ अॅक्टिव्ह रुग्ण असून ६७ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॉटस्पॉट गावे व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त असणाऱ्या गावांमध्ये तपासणीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी गावागावांत आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वतंत्र वाहनातून जाऊन तपासणी करीत आहेत. पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना त्याठिकाणी सूचना देऊन औषधे दिली जात आहेत. ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना कोविड सेंटरला पाठविले जात आहे.
-----------------------
फोटो ओळी : आजरा शहरात कोरोनाची चाचणी करताना वैद्यकीय पथक.
क्रमांक : १८०६२०२१-गड-०५