कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे गेल्या सव्वा वर्षापासून जिल्ह्यातील हॉटेल, ढाबे, उपाहारगृहे, रेस्टॉरंट, खानावळी, नाष्टा सेंटर, कॅफे बंद राहिली. मात्र, पार्सल सेवा सुरू होती. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हॉटेल, ढाबे, आदी सुरू झाले; पण श्रावण आणि त्यापाठोपाठ गणेशोत्सव आल्याने खवय्यांचे प्रमाण कमी राहिले. घरगुती गणेशोत्सव संपल्यानंतर मंगळवारपासून हॉटेल, ढाब्यांवर कोल्हापूरकरांची गर्दी वाढली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना हॉटेलमध्ये जाता आले नव्हते. त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून घरात स्वयंपाक करण्याला सुटी देऊन बाहेर जेवण्यास प्राधान्य दिले आहे. बहुतांशजण आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये जेवण्यास जात आहेत. त्यामुळे शहरातील ताराबाई पार्क, नागाळा पार्क, राजारामपुरी, शाहूपुरी, छत्रपती शिवाजी चौक, लक्ष्मीपुरीसह आर. के. नगर, सानेगुरुजी वसाहत, रंकाळा तलाव परिसर, फुलेवाडी, अशा उपनगरांतील लहान-मोठी हॉटेल फुल्ल झाली आहेत. महामार्गालगतच्या आणि ग्रामीण भागांतील ढाबे, हॉटेल्समध्ये गर्दी झाली आहे.
ई-मेन्यू कार्डची सुविधा
कोरोनामुळे दक्षता म्हणून बहुतांश हॉटेल व्यावसायिकांनी ई-मेन्यू कार्ड आणि ई-पेमेंटची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल या पद्धतीने हॉटेलमध्ये बैठक व्यवस्था केली आहे. ज्या खवय्यांना हॉटेलमध्ये जाणे शक्य नाही, ते पार्सल सेवेला प्राधान्य देत आहेत.
...तर आणखी प्रमाण वाढेल
सध्या अंबाबाई मंदिरासह अन्य मंदिरे, पर्यटनस्थळे बंद आहेत. कर्नाटक, गोवा येथे ये-जा करण्यावर निर्बंध असल्याने कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. मंदिरे, पर्यटनस्थळे सुरू झाल्यानंतर हॉटेलमध्ये येणाऱ्यांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. पुन्हा हॉटेल व्यवसाय बंद होऊ नये यासाठी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना कोल्हापूर हॉटेल मालक संघाने सभासदांना केली आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट : १५००
जिल्ह्यातील संख्या : ३७००
कामगारांची संख्या : २५०००