कोल्हापूर : कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळेच कोविड पॉझिटिव्ह रेट कमी येत असल्याचा दावा करतानाच यापुढेही त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जाणार असल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी माजी पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रशासक बलकवडे यांनी सद्य स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्ध पातळीवर राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
तापसण्यावर भर दिल्यानेच रुग्णसंख्या वाढली असल्याने संभाव्य धोका टाळण्यास मदत झाली आहे. महापालिकेने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट हा कमी येत आहे. लवकरच कोरोनामुक्त कोल्हापूर होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना यापुढेही युद्धपातळीवर राबवल्या जातील, असे बलकवडे यांनी सांगितले.
शहरातील कोविड चित्र -
- शहरातील कोविड चाचण्या - २ लाख ८७ हजार ०० ४७
- पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांची संख्या - ३१ हजार ३५७
- पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १०.९२ टक्के.
- बरे झालेल्या रुग्णांची संख्या - २८ हजार ५०३
- रुग्ण बरे होण्याची टक्केवारी - ९०.५ टक्के.
- सध्या शहरात उपचार घेणारे रुग्णसंख्या - २ हजार १४२.
- आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या - ८१२
- शहरात सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र - १६६.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, माजी गटनेता शारंगधर देशमुख, सुनील पाटील, राहूल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, रविकांत अडसूळ, सहायक आयुक्त संदीप घार्गे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आशपाक आजरेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.