गडहिंग्लज : बालभारतीच्या पुस्तकांची बेकायदा छपाई करून विक्री करीत असल्याप्रकरणी प्रसाद शिवाजी कोकितकर (वय २२, रा. शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज) याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत कॉपीराईटचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, कोकितकर याने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार वितरण केंद्र, कोल्हापूर (बालभारती) यांच्याकडील अकरावी आणि बारावीच्या सर्व माध्यमांच्या व शाखांच्या पाठ्यपुस्तकांच्या ई-बालभारतीच्या वेबसाईटवरील पीडीएफ फाईल डाऊनलोड करून घेतल्या व त्यांची छपाई केली.
दरम्यान, सोमवारी (११) दुपारी दोन वाजता गुणे गुल्ली येथील झेरॉक्स सेंटरमध्ये कोकितकर हा कमी किमतीमध्ये बालभारतीची पुस्तके विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून दोन लाख १८ हजार २५५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये झेरॉक्स मशीन, संगणक, सीपीयू आणि बारावीच्या मराठी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन पुस्तकांची प्रत आदींचा समावेश आहे.
भांडार व्यवस्थापक माणिक पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे करीत आहेत.