कोपार्डे : जनावरांच्या बाजारामुळे जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे समोर असलेल्या सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील व माजी सदस्य एस. के. पाटील यांच्यामध्ये अटीतटीची दुरंगी लढत होणार, असे चित्र स्पष्ट असले तरी लोकसभेचे अपक्ष उमेदवार बजरंग पाटील यांनीही चार प्रभागांत आपले सात उमेदवार उभे करून तिरंगी काटा लढतीचे चित्र निर्माण केले आहे. विकासासाठी एकमुखी बहुमत द्यावे, हा एकच नारा घेऊन मतदारांसमोर कारभारी गेले आहेत.गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विलास पाटील यांनी सात जागा मिळवत बहुमत मिळविले. मात्र, सरपंचपदाचे मागासवर्गीय आरक्षण असल्याने आणि विलास पाटील गटाची एकही मागासवर्गीय महिला निवडून न आल्याने बहुमत नसतानाही एस. के. पाटील गटाच्या मंगल कांबळे यांना सरपंचपद देणे भाग पडले. येथून राजकीय अटीतटीला सुरुवात झाली. दोन्ही गटांच्या राजकीय इर्ष्येने विकासापेक्षा एकमेकांचे उट्टे काढण्याला सुरुवात झाली. यातून अॅट्रॉसिटीच्या केसेस एकमेकांविरुद्ध देण्यापर्यंत मजल गेली. ग्रामसभेत हेवेदावे काढून विकासाचे निर्णय घेण्यापेक्षा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. यातून अडीच कोटींची पेयजल योजना पाच वर्षांपासून लोंबकळत पडली आहे. आमदार चंद्रदीप नरके यांनी हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी १५ लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले, पण श्रेयवादातून साधा ठराव ग्रामपंचायत सदस्यांना आ. नरके यांना देता न आल्याने मंदिराचे काम रखडले आहे.ग्रामस्थांच्या जिव्हाळ््याचा प्रश्न म्हणजे प्लॉट वाटप. यातही राजकीय श्रेयवादाचा प्रश्न करून आता लोकसंख्या वाढल्याने जागेसाठी अडचणीत सापडले. एकूणच गेल्या पाच वर्षांत योजना आल्या दारी पण राजकीय अनिच्छा पडली भारी. यामुळे विकासालाच खो बसला आहे.आता ग्राम पंचायतीत बहुमतात व सत्तेत असणारे दोन गट आमने-सामने आले आहेत. या दोन्ही गटांनीही विकास हवा असेल, तर स्पष्ट बहुमताबरोबर सरपंच आरक्षण असलेल्या उमेदवारालाही निवडणूक द्या, अन्यथा कोणतेच काम होऊ शकणार नाही, अशी हाक मतदारांना द्यायला सुरुवात केली आहे. दोन्ही गट आपणच गावचा विकास करणार, असा नारा करीत असले, तरी हे दोन्ही गट आपल्या राजकीय स्वार्थापोटी विकासाचा गळा घोटत आहेत, असा आरोप करीत लोकसभेचे उमेदवार पै. बजरंग पाटील यांनी चार प्रभागांत सात उमेदवार उभे करून आव्हान दिले आहे. तर विद्यमान उपसरपंच सागर जामदार हे विलास गटातून उमेदवारी न मिळाल्याने आपली पत्नी रूपाली जामदार यांना रिंगणात उतरविले आहे. एकूणच आजी-माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या गटातच दुरंगी लढत होणार असली, तरी पै. बजरंग पाटील यांच्या पॅनेलचा गटाला फायदा किंवा तोटा होणार, तर सागर जामदार आली आपली ताकद इतर प्रभागात कोणाला देणार, यावरच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)
कोपार्डेत अटीतटीची तिरंगी लढत
By admin | Updated: July 23, 2015 00:01 IST