कोल्हापूर : जिल्ह्यातील उद्योग वाढीसाठी आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी दिले.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे गणेश उत्सवानिमित्त आयोजित आरतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते गणेशाची आरती झाली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, काही ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे उद्योगांना जागेच्या समस्या येत आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन म्हणाले, यापुढील काळात लाॅकडाऊन करू नये. उद्योग व्यापार सुरू राहीले तरच अर्थचक्र सुरू राहील. या ठिकाणी एखादा मोठा उद्योग आल्यास छोट्या मोठ्या उद्योजकांना कामे मिळतील, रोजगार वाढेल, शासनाचा महसूल वाढेल. यासाठी येणाऱ्या या उद्योगांना जागेची मोठी समस्या आहे ती सोडवावी.
पाऊस, वादळ व वळवाच्या पावसाने होणारे नुकसान टाळण्यासाठी शिवाजी उद्यमनगर येथे भूमिगत विजेच्या तारा टाकून अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव आहे. यासाठी महापालिकेने सहकार्य करून भूमिगत वायरिंग करण्यास परवानगी द्यावी. त्यापोटीचे शुल्कही माफक आकारावे, अशी मागणी असोसिएशनतर्फे प्रशासक बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.
शिवाजी उद्यमनगर आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या फोटो रूपातील इतिहास प्रशासक बलकवडे आणि पोलीस अधीक्षक बलकवडे यांना दाखविण्यात आला. पूर परिस्थितीत अधीक्षक बलकवडे यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पूर परिस्थितीत बऱ्याच उद्योजकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, रणजीत शाह, संजय अंगडी, नितीन वाडीकर, बाबासोहब कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदिप मांगोरे, अभिषेक सावेकर, प्रदीप व्हरांबळे आदी उपस्थित होते.
फोटो : १२०९२०२१-कोल- पालकमंत्री पाटील
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन येथे गणेश उत्सवानिमित्त रविवारी आयोजित आरतीच्या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील, प्रशासक कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सचिन मेनन, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, रणजीत शाह, संजय अंगडी आदी उपस्थित होते.