चंदगड : कोरोनावर विजय मिळविण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम गतिमान केली आहे. मात्र, ती लस जिल्हा परिषद कोल्हापूरहून तालुक्यातील विविध उपकेंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी तालुक्यातील एका कोरोना योध्द्याची सुरू असलेली धडपड खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्याने गेल्या काही महिन्यांपासून आपली ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याने १ लाख ४० हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
समाजातील अनेक घटक आपल्या कर्तृत्वाने मोठे असतात. पण प्रसिध्दीपासून चार हात लांब असतात. त्यापैकीच एक म्हणजे तालुका आरोग्य कार्यालयातील रुग्णवाहिकेचा वाहनचालक आविष्कार सुरेश नाईक (रा. गवसे, ता. चंदगड) हा होय. पहाटे चंदगडमधून रुग्णवाहिका मार्गस्थ झाली की, अवघ्या दोनएक तासात कोल्हापूर गाठणे व तिथून लस घेऊन परत तेवढ्याच वेळेत चंदगडला परत येणे. वरिष्ठांच्या नियोजनानुसार रुग्णवाहिकेतील लस चंदगड ग्रामीण रुग्णालय, कानूर, कोवाड, अडकूर, माणगाव, हेरे व तुडीये या प्राथमिक केंद्रांमध्येही लस पोहोचविण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अविरतपणे सुरू आहे. एरवी आपले हे रोजचेच काम असून त्यात काय नवल नाही, असे म्हणून अनेकजण आपली जबाबदारी टाळत असतात. पण या काळात आविष्कार यांनी कधीच टाळाटाळ केली नाही. त्यामुळेच त्यांनी जवळपास आणलेल्या कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या डोसमुळे १ लाख ४० हजार जणांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यांची कामाविषयीची तळमळ व सचोटीमुळे त्यांनाच या कामासाठी नेहमी वरिष्ठ पाठवत असतात.
...........
चांगल्या कामाची दखल
सुरुवातीला दोन वर्षे आविष्कार हे राष्ट्रीय बालकल्याण विभागाच्या गाडीवर वाहनचालक होते. त्याठिकाणी केलेल्या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेने १०२ रुग्णवाहिकेवर काम करण्याची संधी दिली. त्यांची नेमणूक राजगोळीच्या प्राथमिक केंद्रामध्येही करण्यात आली होती. मात्र, ते केंद्र अद्याप सुरू नसल्याने तालुका आरोग्य कार्यालयात ते सध्या कार्यरत आहेत.
...तर खऱ्याअर्थाने न्याय
कोराेना काळात कामाचा ताण अधिकच वाढला आहे. पण तुटपुंज्या पगारामुळे कामात कसूर न करता ते सुरूच आहे. समान वेतन समान न्याय याप्रमाणे आविष्कारप्रमाणेच इतर सर्वांना सरकारकडून न्याय मिळाल्यास त्यांच्या कामाला खऱ्याअर्थाने न्याय मिळेल.
अविष्कार नाईक : ०८०९२०२१-गड-०२