गटर्स, अंतर्गत रस्ते, वेळेवर कचरा उठाव, नियमित पाणी अशा मूलभूत सुविधा भक्कम असलेल्या शाहू बँक प्रभागाला ड्रेनेजच्या समस्येचा मोठा विळखा आहे. चिंचोळे रस्ते व जुन्या कोल्हापूरचा गावठाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागात ड्रेनेजची सोयदेखील फार जुनी आहे.प्रभागात देवणे गल्ली, कोष्टी गल्ली, मंडलिक गल्ली नंबर एक व दोन, सुबराव गवळी तालीम मंडळ, माने गल्ली, राम गल्ली, शाहू बँक परिसर, कोळेकर तिकटी, गुलाब गल्लीचा काहीअंशी भाग, ताराराणी शाळा परिसर, शेळके उद्यान, नंगीवली तालीम मंडळाचा काही प्रमाणात भाग, अशी ओबडधोबड तसेच प्रामुख्याने अरूंद गल्ल्या, चिंचोळे बोळ अशी रचना आहे.गावठाण भाग असल्याने ड्रेनेज पाईपलाईनचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे त्या सडल्या आहेत. यासाठी स्थानिक नगरसेविकांकडे संपूर्ण ड्रेनेज पाईपलाईन बदलावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी नगरसेविकांनी त्याला होकार देत काम सुरू केले आहे.अनेक ठिकाणी काम सुरू आहे. पण, त्याची गती संथ आहे. त्याचबरोबर या विशेषत: गटर्स, वेळेवर कचरा उठाव आणि वेळोवेळी स्वच्छता प्राधान्याने लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. तसेच छत्रपती ताराराणी विद्यालय आहे. १८५ मुलांची पटसंख्या या विद्यालयाची आहे. या शाळेत बालकल्याण संकुलातील मुले-मुली शिक्षण घेत आहेत. मनपा शाळेकडे नगरसेविकेंचे व्यक्तिगत लक्ष असते. याशिवाय या प्रभागात शेळके उद्यानामध्ये लहान मुलांसाठी अनेक खेळणी व मोठ्यांसाठी योगासने करण्यासाठी सिमेंट कठडा करून देण्यात आला आहे. एकंदरीत, या प्रभागात फारशा समस्या नसल्याची स्थिती जाणवते.प्रभागात गेली पंधरा वर्षे संभाजी देवणे यांचीच एकहाती सत्ता आहे. त्यांनी प्रभागातील सर्व अंतर्गत रस्ते व ड्रेनेजलाईनचे काम हाती घेतले आहे. काही अडचणी आल्यास नगरसेविका शारदा देवणे या नागरिकांच्या मदतीला धावून येतात. सध्या अंतर्गत रस्ते व कचरा उठावही वेळेत होत आहे. त्याचबरोबर पाण्याची कोणतीही तक्रार नाही. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांत कधीही प्रभागात टँकर आणावा लागला नाही. त्यामुळे हा प्रभाग टँकरमुक्तच म्हणावा लागेल. - राहुल कापडे, नागरिक (शाहू बँक प्रभाग)प्रभागात काही ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईनसाठी खोदून ठेवले आहे. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. त्यावर नगरसेविका देवणे यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात. प्रभागातील प्रत्येक कामात वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे आहे.- धोंडिराम चौगुले, नागरिक (शाहू बँक प्रभाग) लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. प्रभागात एल.ई.डी. (विद्युत दिवे) लावण्यास प्राधान्य देणार आहोत. सुबराव गवळी तालीम परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी सभागृह बांधण्याचा मानस आहे.-शारदा देवणे, नगरसेविका, शाहू बँक
अंतर्गत ड्रेनेज सुविधेचे पॅचअप सुरू
By admin | Updated: January 16, 2015 00:13 IST