दिंडनेर्ली ( सागर शिंदे)
महावितरणच्या हाय व्होल्टेजचा झटका सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. ट्रान्सफार्मरच्या तांत्रिक देखभाल-दुरुस्तीकडे वेळोवेळी लक्ष न दिल्याने ट्रान्सफाॅर्मरमधून उच्च विद्युत्भार वाढल्याने दिंडनेर्ली (ता. करवीर) मधील जवळपास दीडशे उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. शिंगणापूर (ता. करवीर) येथेही अशाच प्रकारे उच्च दाबाच्या झटक्याने मोठे नुकसान झाले आहे .
कोरोनाच्या महामारीतून सर्वसामान्य जनता बाहेर येत असतानाच वाढत्या महागाईचे ओझे डोक्यावर पडत आहे. यातच भरमसाट वीज बिले आली आहेत. या सर्वांतून संसाराचा मेळ घालताना कुटुंबप्रमुख मेटाकुटीला आले आहेत. विद्युत्भाराच्या झटक्याने घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, बल्ब, कॉम्प्युटर तसेच अन्य विद्युत उपकरणे व्यावसायिक साधनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करणे गरजेचे होते; पण अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वीज बिलामध्ये सर्व प्रकारचे वेगवेगळे दर आकारले जातात, थकीत बिलाला व्याज लावले जाते, थकीत बिलापोटी कनेक्शन कट केले व पुन्हा जोडावयाची असल्यास पुन्हा भरमसाट चार्जेस द्यावे लागतात; पण महावितरणच्या चुकीच्या, अनागोंदी कारभारामुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा वेळी महावितरण फारसे लक्ष देत नाही.
सर्वत्र वरचेवर विद्युत बिघाड होऊन, विद्युत्तारा तुटून, उच्च दाब वाढून विद्युत उपकरणांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले असून, महावितरणच्या गलथानपणाचा झटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. यासाठी होणाऱ्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.