शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
3
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
4
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
5
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
6
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
7
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
8
Nashik Municipal Election 2026: एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन
9
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
10
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
11
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
12
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
13
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
14
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
15
Mumbai Crime: डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
16
Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
17
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
18
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
19
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
20
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधतेचे संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी

By admin | Updated: March 10, 2017 00:22 IST

अधिकराव जाधव : नागरिकांना प्रोत्साहित करावे लागेल

जैवविविधतेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी, तिचा वापर करताना जैवविविधता टिकून राहील तसेच जैविक साधनसंपत्तीच्या वापरातून प्राप्त झालेल्या लाभाचे समन्यायी वाटप होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य जैविक विविधता नियम २००८ (सुधारणा २०१६) मधील तरतुदींनुसार महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळावर पाच अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांत शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अधिकराव जाधव यांचा समावेश केला आहे. डॉ. जाधव २५ वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत असून, गेल्या पाच वर्षांपासून ते क्युबाच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाचे सल्लागार म्हणूनही काम पाहत आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला थेट संवाद...प्रश्न : जैवविविधता म्हणजे नेमकं काय?उत्तर : जैवविविधता म्हणजे फार मोठी संकल्पना असावी, असा आपला गैरसमज असतो; किंबहुना तो दुर्मीळ गोष्टी जतन करण्यासाठी राबविण्यात येत असलेला एखादा शासकीय प्रकल्प आहे, असे प्रत्येकाला वाटते; परंतु हे खरे नाही. जैवविविधता म्हणजे आपल्या आसपासचा निसर्ग, प्राणी, पशू, पक्षी, कीटक, सूक्ष्म जीव आहेत. त्यांचा समावेश जैवविविधतेत होतो आणि त्यांचे आहे त्या स्थितीत त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण न करता जतन करणे म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन करणे होय. प्रत्येक जीव जगला पाहिजे, इतकंच यामध्ये अपेक्षित आहे. प्रश्न : मानवी जीवनात जैवविविधतेचे महत्त्व काय? उत्तर : मानवाच्या शाश्वत अस्तित्वासाठी निसर्गात जैवविविधता असणे अत्यंत आवश्यक आहे. कित्येक नैसर्गिक प्रक्रियांमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. पाण्याचे व हवेचे शुद्धिकरण, परागीभवन, उत्सर्जित केला जाणारा कार्बन डायआॅक्साईड शोषून घेणं, नैसर्गिक व जैविक कीड नियंत्रण, या प्रक्रियांमुळेच मानवी जीवन सुसह्य होते. भारतातील ७० टक्के जैवविविधता सह्याद्रीच्या कड्या कपारींमध्ये वसली आहे. अतिसूक्ष्म जीवाणूंपासून हत्तीपर्यंत सगळेच यामध्ये भर घालतात.प्रश्न : जैवविविधतेला काय धोका आहे?उत्तर : मानवाने आपल्या प्रगतीसाठी इमारती, रस्ते, धरणे, खनिजसंपत्तीसाठी पर्यावरणाचा अमर्याद वापर केला आहे. त्यामुळे त्या-त्या भागात असणाऱ्या वनस्पती, कीटक, पशू, पक्षी यांचा अधिवास उद्ध्वस्त झाला आहे. एक विशिष्ट प्रकारचे झाड संपले की त्यावर अवलंबून असणारे कीटक, त्यांच्यावर अवलंबून असणारे पक्षी संपतात. त्यामुळे अन्नसाखळीचे अस्तित्व धोक्यात येते. याचे गंभीर परिणाम टप्प्याटप्प्याने मानवी अस्तित्वावरच होत असतात; परंतु त्याचा वेग कमी असल्याने ते जाणवत नाहीत. प्रश्न : जैवविविधता नष्ट होण्यास कारणीभूत घटक कोणते?उत्तर : मानवाची उदासीनता व निसर्गातील प्रत्येक घटकाकडे पाहण्याचा बदलत चाललेला दृष्टिकोन याला कारणीभूत आहे. जैवविविधता संपन्न असलेल्या अभयारण्ये, घाटांवर फक्त पर्यटन म्हणून वेळ घालविण्यासाठी नागरिक जातात. त्यामुळे तिथल्या नैसर्गिक जैवविविधतेचे नुकसान होते, याची त्यांना जाणीव नाही. त्यासह प्रदूषण, गोंगाट, बदलते निसर्गचक्र हे घटकही जैवविविधता नष्ट होण्यास कारणीभूत आहेत.प्रश्न : जैवविविधता नष्ट झाल्याने कोणते प्रश्न निर्माण होत आहेत? उत्तर : नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने जंगली प्राण्यांचे मानवी वाड्या-वस्त्यांवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी भांबावून, गोंधळून जाऊन असे प्राणी मानवी वस्त्यांवर हल्ले करू लागतात. अनेकदा आपण हत्तीच्या कळपांमुळे शेतीचे नुकसान झाल्याचे ऐकतो. हे सर्व जैवविविधता नष्ट झाल्याचे परिणामच आहेत. प्रश्न : समितीतर्फे जैवविविधतेसाठी काय उपाय केले जाणार आहेत?उत्तर : जैवविविधता जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि यात फक्त सुशिक्षित लोकच योगदान देऊ शकतात, असे नाही तर डोंगराळ भागातील एखादी अडाणी व्यक्तीसुद्धा फार मोठे काम करू शकते; परंतु त्यांना आपल्या आसपास जे आहे, त्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे पहिल्यांदा जैवविविधतेचे महत्त्व त्यांना पटवून द्यावे लागणार आहे. यामध्ये मग एखादे आंब्याचे झाड असेल वा हजार वर्षांपूर्वीची बियाणे; ते नष्ट होऊ न देता योग्य ती शास्त्रशुद्ध माहिती दिली जाईल. मग तो आजऱ्याचा घनसाळ असो वा अन्य बियाणे; त्यांचं महत्त्व लोकांना सांगावे लागेल. त्यासह आपल्या आसपास असणारे प्राणी, कीटक हे निसर्गचक्रासाठी फार महत्त्वपूर्ण आहेत. मग त्यात उपद्रवी कीटकांचेही महत्त्व त्यांना समजावून द्यावे लागणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर समितीमार्फत प्रबोधन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर त्यासाठी राखीव निधी ठेवावा लागेल.प्रश्न : जनतेला जैवविविधतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी काही उपाय?उत्तर : डोंगराळ भागात, जंगलात राहणाऱ्या लोकांना तिथल्या वनस्पतींचे उपयोग त्यांना पटवून दिल्यास ते संवर्धनासाठी प्रयत्न करतील व शहराकडे नोकरी-धंद्यासाठी येणारे लोंढे थांबतील व स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. मग त्यामध्ये तेंडूपत्ता, शिकेकाई, कोकम, रेशीम, आदींद्वारे सहजगत्या अर्थार्जन शक्य आहे. यासाठी स्थानिक पातळीवर शास्त्रीय, तांत्रिक व प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ८० टक्के वनस्पती व प्राणी आपल्याला अजूनही माहीत नाहीत. त्यांची ओळख पटवून त्यांचे जैवविविधतेतील स्थान समजून घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे लागेल. त्यामुळे जैवविविधता संवर्धित भागात पर्यटनाला चालनाही मिळू शकेल. प्रश्न : नागरिक यामध्ये कसे योगदान देऊ शकतात? उत्तर : सध्याच्या तरुणाईकडे तंत्रज्ञान आहे. त्याचा वापर करून ती लवकर प्रबोधन करू शकते. एखाद्या वेळेस जंगलात वणवा पेटल्यास मित्र, ओळखीच्यांना एकत्र करून तो विझविण्यास मदत करू शकेल. त्यामुळे हजारो एकरांमधील जैवविविधता आगीपासून वाचू शकेल. पर्यटनस्थळी फक्त सेल्फी काढण्यासाठी तर जावेच; पण तिथल्या जैवविविधतेचं महत्त्व पटवून तरुणाईच्या विचारांना दिशा दिल्यास ते यामध्ये नक्कीच योगदान देऊ शकतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासह शेतकऱ्यांनीही मिश्रशेतीचा अवलंब केल्यास व शेताच्या बांधावर उंबर, वड, पिंपळ अशी विविध वृक्षलागवड केल्यास प्रत्येक ऋतूत तिथे जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण होऊन अनावश्यक कीटकनाशकांवर केला जाणार खर्चही वाचू शकेल. जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवणे हेदेखील जैवविविधता संवर्धनातील मोठे पाऊलच असणार आहे.- संतोष तोडकर