कोल्हापूर : ऋतुराज पाटील व सचिन गायकवाड यांच्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर बालगोपाल तालीम मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर (ब) ८-० अशा गोलने दणदणीत विजय मिळवित, तर संध्यामठ तरूण मंडळाने शिवनेरी स्पोर्टस्ला ‘सडनडेथ’वर पराभूत करीत शुक्रवारी अवधूत घारगे स्मृतिचषक सीनिअर फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. पहिला सामना संध्यामठ तरूण मंडळ आणि शिवनेरी स्पोर्टस् यांच्यात झाला. दोन्ही संघांकडून तोडीस तोड खेळ झाल्याने पूर्णवेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. टायब्रेकरवर सामना ४-४ अशा गोलने बरोबरीत राहिला. अखेर सडनडेथवर ‘संध्यामठ’ने शिवनेरीला पराभूत केले. ‘संध्यामठ’कडून अजिंक्य गुजर, सागर काळकर, सिध्देश यादव, अभिजित यादव, अभिजित सुतार, तर ‘शिवनेरी’च्या अर्जुन साळोखे, भारत लोकरे, युवराज पाटोळे, व्हेलीन सिको यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ (ब) एकमेकांशी भिडले. यात आक्रमक खेळ व अचून फिनिशिंगच्या जोरावर ‘बालगोपाल’ने गोलचा धडाका लावला. यात त्यांच्या रोहित कुरणेने बबलू नाईकच्या पासवर दुसऱ्या मिनिटाला पहिला गोल नोंदविला. त्यानंतर सचिन गायकवाडने नवव्या मिनिटाला, ऋतुराज पाटीलने २० व्या, तर ३० व्या मिनिटाला सचिन गायकवाडने रोहित कुरणेच्या पासवर वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या खात्यात चौथा गोल नोंदविला. पूर्वार्धात ‘बालगोपाल’ची ४-० अशी आघाडी राहिली. उत्तरार्धात बालगोपालने आक्रमक खेळ कायम ठेवला. त्यांच्या ऋतुराज पाटीलने सामन्याच्या ६२ व्या व ८९ व्या मिनिटाला, तर अजिंक्य जाधवने ६७ व्या आणि सचिन गायकवाडने ६९ व्या मिनिटाला गोल करून संघाला आठ गोलची आघाडी मिळवून दिली. ‘खंडोबा’च्या अजीज मोमीन, विद्याधर मोरे, अमित पाटील, भूषण मेढे, संकेत चव्हाण यांनी चांगली झुंज दिली. पूर्ण सामन्यात ‘बालगोपाल’ने वर्चस्व राखत ‘खंडोबा’ वर ८-० अशा गोलने दणदणीत विजय मिळविला. अर्जुन साळोखे (शिवनेरी स्पोर्टस्) व अजीज मोमीन (खंडोबा ‘ब’) हे लढवय्या खेळाडू ठरले. (प्र्रतिनिधी)...‘युड्रीम’ फुटबॉल टॅलेंट हंट आजकोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन व जर्मनीतील फुटबॉल क्लबतर्फे शनिवार पोलो मैदानावर १३ व १४ वर्षांखालील मुलांसाठी ‘युड्रीम’ फुटबॉल टॅलेंट हंट होणार आहे. देशातील ५४ शहरांत हे टॅलेंट हंट होणार असून त्यातून सेव्हन साईड पध्दतीने ३० मुलांची निवड केली जाणार आहे. त्यांना जर्मनी फुटबॉल प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
‘बालगोपाल’चा ‘खंडोबा’ (ब)वर विजय
By admin | Updated: February 7, 2015 00:57 IST