कोल्हापूर : केंद्र सरकारच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारी सकाळी १० वाजता शहरातून सायकल रॅली व निदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समन्वयक सचिन प्रल्हाद चव्हाण व सचिव संजय पोवार वाईकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. या जीवघेण्या महागाईविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले व पालकमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आंदोलनाचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
निदर्शनात व सायकल रॅलीस आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, तालुका अध्यक्ष, शहर ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय सेवादल, इंटक संघटना, ओबीसी सेल, व्हीजेएनटी सेल, असंघटित कामगार सेल, अपंग सेल, माजी सैनिक संघटना, अल्पसंख्याक सेल, तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत.
सोमवारी सकाळी १० वाजता कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथून सायकल रॅलीस सुरुवात होईल. त्यानंतर दसरा चौक, सीपीआर हॉस्पिटल, शिवाजी पुतळा, भवानी मंडप, बिंदू चौक, उमा टॉकीज पेट्रोल पंप येथे विसर्जित होणार आहे.