कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार आहे. हे बुडते जहाज पाहूनच जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे सुरक्षित बेटावर राहिले आहेत, अशी टीका भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी केली.भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार यशोदा प्रकाश मोहिते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. जाधव म्हणाले, महानगरपालिकेच्या राजकारणात उतरलेला जनसुराज्य शक्ती पक्षदेखील गेली दहा वर्षे सत्तेत सहभागी होता. यंदाची निवडणूक जनसुराज्य आणि राष्ट्रवादी एकत्रित लढत आहेत; परंतु या पक्षाचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे महापालिकेत उडालेला गोंधळ, माजलेली बजबजपुरी, ढपला संस्कृती आणि जनतेच्या डोळ्यांत होत असलेली धूळफेक याची विनय कोरे यांना पूर्णपणे जाणीव आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे जहाज बुडणार याचा अंदाज आल्याने कोरे यांनी सुरक्षितस्थळावर राहण्याचा निर्णय घेतला असावा.ते पुढे म्हणाले, महापालिकेवर भाजप-ताराराणी महायुतीची सत्ता येणार हे निश्चित असून यासाठी जनतेनेच पुढाकार घेतला आहे. गेली दहा वर्षे महापालिकेत सुरू असलेली ढपलेबाजी, टक्केवारी, पाकीट संस्कृती, लँड माफियांचा धुमाकूळ, नेत्यांची हुकूमशाही या प्रकारामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष भुईसपाट होणार यात शंका नाही. यावेळी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीचे जहाज बुडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2015 00:25 IST