चंद्रकांत पाटील-- गगनबावडा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील आरक्षणाच्या तारखा जाहीर होताच गगनबावडा तालुक्यातील राजकारणालाही रंग भरत आहे. यावेळी आरक्षण काय असेल? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले असून, मागील पडलेल्या आरक्षणानुसारकाहींनी नव्याने आडाखे बांधून तयारीही सुरू केली आहे. तालुक्यातील गटा-तटाचे राजकारण बघता मागील पंचवार्षिकमध्ये मिळालेले यश टिकविण्यासाठी कॉँग्रेसच्या सतेज पाटील गटाला व राष्ट्रवादीच्या पी. जी. शिंदे गटाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून तालुक्यात शिवसेनेने मारलेली मुसंडी आणि भक्कम गटबांधणीच्या मागे असणारा भाजप यांचे तगडे आव्हान असणार आहे. भौगोलिकदृष्ट्या गगनबावडा तालुका लहान असून, येथे तिसंगी व असळज असे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ, तर कातळी, असळज, मांडुकली व तिसंगी असे चार पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. तालुक्यातील मतदारांची संख्या २५ हजार २६ इतकी असून, त्यात महिला मतदार ११ हजार ८५७ व पुरुष मतदार १३ हजार १६९ इतके आहेत. मागील निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी तिरंगी लढत होऊन त्यात कॉँग्रेसने असळज जिल्हा परिषद मतदारंघातून प्रिया प्रकाश वरेकर व पंचायत समिती असळज मतदारसंघातून तानाजी पाटणकर व कातळी मतदारसंघातूनशालिनी शेळके या तिन्ही जागांवर कॉँग्रेसने विजय मिळविला होता. तर तिसंगी मतदारसंघातून पंचायत समितीच्या सविता कोटकर या एकमेव विजयी झाल्या होत्या. येथे पी. जी. शिंदे गटातून जिल्हा परिषद मतदारसंघातून मेघाराणी जाधव व मांडुकली पंचायत समिती मतदारसंघातून बाळासाहेब कांबळे विजयी झाले होते. या निवडणुकीत तालुक्यात शिवसेनेला हार पत्करावी लागली होती.गेल्या पाच वर्षांत तालुक्यात अंतर्गत बऱ्याच घडामोडी घडल्या असून, पी. जी. शिंदे यांच्या राष्ट्रवादी गटाला गळती लागली. त्यांचे हुकमी मोहरे मा. जि. प. सदस्य भगवान पाटील, बबनराव युटाले, गजानन चौधरी व मा. सभापती कै. गुंडा कांबळे यांचा गट कॉँग्रेसमध्ये दाखल झाला. आमदारकीच्या झालेल्या निवडणुकीत नरके यांनी संयमी राजकारण करून तालुका अंतर्गत कॉँग्रेसवर मतदानाची आघाडी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला बसलेला हादरा व कॉँग्रेसला मिळालेले कमी मतदान आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी आपल्या संपर्काच्या माध्यमातून खोलवर मारलेली मुंसडी बघता कॉँग्रेस व राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान निर्माण केल्याचे चित्र आहे. लोकसभा व राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षाला मिळालेल्या यशामुळे गगनबावडा तालुक्यात या पक्षाने आपली पाळेमुळे घट्ट रोवायला सुरुवात केली आहे.तालुक्यामध्ये प्रामुख्याने कॉँग्रेसच्या सतेज पाटील गटाची ताकद मोठी असून, आतापर्यंत झालेल्या जि.प. व पं. स.च्या निवडणुकीत त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. प्रामुख्याने असळज मतदारसंघात पी. जी. शिंदे गटाला पडलेल्या खिंडारामुळे असळज मतदारासंघाप्रमाणेच तिसंगी मतदारसंघही प्रभावशाली बनला आहे. त्यामुळे यावेळी सतेज पाटील गट या मतदारसंघातही आपले वर्चस्व स्थापेल, असे दिसते. असे असले तरी असळज मतदारसंघातील धुंदवडे खोरीतील एक युवा नेता सतेज पाटील गटावर नाराज असल्याने ऐनवेळी त्याची काय भूमिका असेल, यावर कॉँग्रेसच्या बोलकिल्ल्याला सुरुंग लागू शकतो. त्याचबरोबर त्यांच्या गटामध्ये असणाऱ्या तगड्या उमेदवारांच्या रस्सीखेचीमुळे नाराज उमेदवारांच्याकार्यकर्त्यांमुळे फटका बसण्याची अधिक शक्यता आहे. तर दुसरीकडे आम. चंद्रदीप नरके गटाला तगड्या उमेदवाराच्या शोधात राहावे लागणार आहे. ऐनवेळी हा गट नाराज उमेदवाराला आपला ‘मोहरा’ बनवून इतर गटांसमोर आव्हान निर्माण करण्याची अधिक शक्यता आहे.कॉँग्रेसप्रणित सतेज पाटील गट, शिवसेनाप्रणित आमदार चंद्रदीप नरके गट व राष्ट्रवादीप्रणित पी. जी. शिंदे गट एकमेकांसमोर आव्हान उभे करीत असल्याचे चित्र दिसत असले तरी तालुक्यात पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उडी मारण्याच्या पवित्र्यात असलेल्या भाजप गटामुळे ऐनवेळी निवडणुकीचे चित्रच बदलण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेत काटा लढत
By admin | Updated: September 6, 2016 01:16 IST