कसबा बावडा : कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्याजवळ नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाची मुदत संपून तीन वर्षे झाली तरी प्रकल्प पूर्ण न झाल्याने नाबार्डसह सार्वजनिक बांधकाम विभागने नाराजी व्यक्त केली आहे. आता ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत म्हणजेच येत्या सात महिन्यांत हे काम पूर्ण करा, अशी डेडलाईन सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला दिली आहे.
'कोल्हापूर बंधारा' अशी राज्यभर ओळख करून देणारा राजाराम बंधारा कसबा बावड्यात पंचगंगा नदीवर १९२८ ला बांधला गेला. पाणी अडवणे व गरजेनुसार खालील पात्रात पाणी सोडणे यासाठी बंधाऱ्याची बांधणी करण्यात आली. मात्र, बंधाऱ्याची उंची खूपच कमी असल्याने थोड्याशा पावसाने देखील हा बंधारा पाण्याखाली जातो वाहतूक ठप्प होते. त्यामुळे या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा निर्णय झाला. जानेवारी २०१७ ला या पुलाच्या कामाची वर्कऑर्डर निघाली. एप्रिल २०१७ ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली. १६ ते १७ महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण करण्याची सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आली होती. मात्र, कधी पुराच्या पाण्याचा अडथळा तर कधी भूसंपादन जमिनीचा मोबदला देण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांनी बांधकामास केलेला विरोध यामुळे कामाला सातत्याने विलंब होत गेला.
आता जमीन भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. जसे करार होतील त्यानुसार दस्तची प्रक्रिया सुरू होऊन शेतकऱ्यांना मोबदला मिळू लागला आहे. त्यामुळे आता ठेकेदार कंपनीने कामाची गती वाढवून येत्या ३१ डिसेंबरअखेर हे काम पूर्ण करावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकामने कंपनीला दिल्या आहेत. जानेवारी २०२२ मध्ये या पुलावरून वाहतूक सुरू होईल, अशा गतीने कामाला गती द्या, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
चौकट : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या पुलाचे काम पूर्णपणे थंडावते. यंदा मात्र पावसाळ्यात देखील या पुलाचे काम सुरू राहणार असून वडणगेकडील बाजूस पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता एस. बी. इंगवले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फोटो : १९ बावडा पूल
कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ कासवगतीने सुरू असलेल्या पुलाचे काम ३१ डिसेंबरअखेर पूर्ण करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकामने ठेकेदार कंपनीला दिल्या आहेत.
(फोटो :रमेश पाटील,कसबा बावडा )