इचलकरंजी : शहरात गेले आठवडाभर सुरू असलेले नगरपालिकेच्या ‘गुडमॉर्निंग’ पथकाचे काम चांगले असले तरी पालिकेच्या सफाई कामगारांकडून, तसेच मक्तेदारांकडून स्वच्छतेचे आणि कचरा उठावाचे काम होत नसल्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे फिरतीवर असतानाच मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांना खडे बोल सुनावले.शहर शौचालययुक्त करण्यासाठी नगरपालिकेने गुडमॉर्निंग पथक स्थापन केले असून, हे पथक दररोज विविध भागात फिरती करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करते. बुधवारी पथकाने पहाटेपासूनच फिरतीला सुरुवात केली. बुधवारी या पथकाबरोबर मुख्याधिकारी डॉ. रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे, आरोग्य अधिकारी डॉ. संगेवार, स्वच्छता निरीक्षक, तसेच काही कर्मचारी होते. पथकाने गुरू टॉकीज परिसर, आवळे मैदान, प्रांत कार्यालय, गोसावी गल्ली, आयजीएम हॉस्पिटल भाग, पंचवटी थिएटर ते पाण्याची टाकी परिसर, आदी ठिकाणी फिरती केली.पथकाला उघड्यावर शौच करणारे तीसजण मिळून आले. त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. असा प्रकार सुरू असतानाच आवळे मैदान, आयजीएम हॉस्पिटल, पंचवटी थिएटर परिसर अशा ठिकाणच्या नागरिकांनी गटारी स्वच्छ होत नाहीत. त्या सातत्याने तुंबलेल्या असतात. अशा तक्रारी करीत कचरा उठाव होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत, हे दाखवून दिले. त्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांकडे विचारणा केली. गुडमॉर्निंग पथकाचे काम चांगले आहे. मात्र, सफाईचे काम वेळेत होत नसल्याबद्दल थेट मुख्याधिकारी डॉ. रसाळ व आरोग्य अधिकारी डॉ. संगेवार यांच्याकडे तक्रारी केल्या. वारंवार तक्रारी होत असतानाच बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीगही दिसले. म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी डॉ. संगेवार यांनाच त्याबद्दल खडे बोल सुनावले. याचवेळी एकाच मक्तेदाराकडे तीन प्रभागांतला सफाईचा ठेका असल्याचे चित्रही समोर आले. (प्रतिनिधी)स्वच्छतेसाठी आज संयुक्त बैठकखासगी मक्ता दिलेल्या ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आल्यानंतर मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी आज, गुरुवारी खासगी ठेका घेणारे मक्तेदार व पालिकेचे स्वच्छता निरीक्षक यांची सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. त्याचबरोबर शहरामध्ये असलेल्या सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्याबरोबरच त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
अस्वच्छतेबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी
By admin | Updated: November 26, 2015 00:35 IST