वडणगे : माझ्या वाढदिवसाला शेतकऱ्यांसाठी खत गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याला जमेल तितके खत आणावे. रासायनिक खत नुसते नसावे, त्यामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खत असावे. जेवढे खत जमा होईल तेवढेच खत मी आणि माझी पत्नी स्वत:च्या खर्चाने दहा हजार शेतकऱ्यांना वाटप करणार असल्याचे सांगून श्रीमंतांपेक्षा ज्यांच्या गळ्याला आले आहे, अशा शेतकऱ्यांची दहा-दहा लाख कर्जे असतील तर ते माफ करावे, असे कर्जमाफीसंदर्भात आपले वैयक्तिक मत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. वडणगे (ता. करवीर) येथील साखळकर मळ्यात झालेल्या ‘शिवार संवाद’ सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शासनाच्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विरोधकांचे कर्जमाफीवरून निव्वळ राजकारण करण्याचा हेतू असून, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत काहीही देणं-घेणं नाही. यावेळी शेतकऱ्यांकडून विविध मागण्यांची निवेदने मंत्री पाटील यांना देण्यात आली. जिल्हा संघटक बाबा देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी के. एस. चौगले, शिवाजी बुवा, संभाजीराव पाटील, श्रीकांत घाटगे, विठ्ठल नांगरे, बाबासो जौंदाळ, सरपंच जयश्री नाईक, डॉ. सुनील बी. पाटील, सुनील पंडित, सचिन चौगले, सुनील परीट, आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा यापूर्वी कधीही उपक्रम झालेला नव्हता. पालकमंत्र्यांनी थेट शेतावर येऊन शासकीय योजनांची माहिती देऊन, अडीअडचणींबाबत संवाद साधण्याचा अभिनव उपक्रम केला त्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत होते.
वाढदिवसानिमित्त खत संकलित करणार
By admin | Updated: May 26, 2017 23:51 IST