लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील पालिका मालकीच्या रेफ्युज कॉम्पॅक्टरला पंधरा दिवसांपूर्वी आग लागून प्रचंड नुकसान झाले. या वाहनाचा इन्शुरन्स काढला असता, तर त्याचा भुर्दंड पालिकेला बसला नसता. त्यामुळे या कामाबाबत हलगर्जीपणा केलेल्या संबंधितांकडून वाहनाचे नुकसान वसूल करावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावचकर यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिले.
निवेदनात, शहरातील कचरा उठाव करण्यासाठी ६८ घंटागाड्या, ४ टिप्पर व २ रेफ्युज कॉम्पॅक्टर ही वाहने ८ डिसेंबरला औरंगाबादमधील एका कंपनीला दिली होती. दरम्यान, १५ डिसेंबरला कचरा डेपोवर कॉम्पॅक्टरला आग लागून त्याचे प्रचंड नुकसान झाले. या वाहनांच्या इन्शुरन्सचा कालावधी २९ सप्टेंबर २०२० पर्यंत होता, परंतु आरोग्य विभागाने इन्शुरन्सची मुदत संपूनही नव्याने इन्शुरन्स काढणे गरजेचे होते, परंतु आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले. घनकचरा प्रकल्पांतर्गत वरील सर्व वाहने आरोग्य विभागाकडून खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहन विभागाकडे या वाहनांचे कोणतेही रेकॉर्ड दिले गेले नव्हते. तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसान वसूल करावे, असे म्हटले आहे.