कोल्हापूर : रुग्णालयातील ऑक्सिजन वायूनलिका व यंत्रणांची तपासणी, फायर, इलेक्ट्रीकल व स्ट्रक्चरल ऑडिटसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यांची समिती नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये घडत असलेल्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वेगवेगळ्या समित्या नियुक्त करून अधिकाऱ्यांवर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या ऑडिट समितीचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी असून आयुक्त, पोलीस अधीक्षक, शासकीय तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह १७ जण या समितीचे सदस्य आहेत.
--
दोन महिन्यांतील डेथ ऑडिट होणार
जिल्ह्यात कोरोनाने रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने डेथ ऑडिट करण्यासाठी तालुकानिहाय समिती नियुक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील या समितीचे प्रमुख उपविभागीय अधिकारी आहेत. त्या समितीचे सदस्य म्हणून तीन ते पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समित्यांनी जिल्हयातील सर्व शासकीय, खासगी रुग्णांलयातील व कोविड केअर सेंटरमधील मागील दोन महिन्यांतील कोरोनाबाधित रुग्णांचे झालेल्या मृत्यूंचे डेथ ऑडिट करून त्याचा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे द्यायचा आहे.
---