कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार प्राथमिक शिक्षक बँकेने डी आर सेंटर व फास्टॅग सुविधा सुरु केली आहे. राजर्षी शाहू जयंतीचे औचित्य साधून या अद्यावत प्रणालीसह शिरोळ शाखेच्या स्ववास्तूत प्रवेश करण्यात आला. दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, पंचायत समितीच्या सभापती दीपाली परीट व बँकेचे अध्यी प्रशांतकुमार पोतदार यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम झाला.
गणपतराव पाटील म्हणाले, शिक्षक बँकेने राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे आपल्या ग्राहकांना अद्ययावत सुविधा दिल्या आहेत. पगार खातेदारांना ४० लाख तर पेन्शन खातेदारांना ५ लाख अपघात विम्याची योजना सुरू करून आदर्शवत काम केले आहे. अमरसिंह पाटील म्हणाले, बँकेने शिरोळ नगरीत डीआर सेंटर सुरू करून शिरोळ नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा राेवला आहे. बँकेला लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
बँकेचे अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार यांनी आढावा घेतला. वार्षिक सर्वसाधारण सभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अल्पावधीत केली. यापुढे बँकेमार्फत मोबाईल ॲप, इंटरनेट बॅकिंग, आयएमपीएस, यूपीआय या सेवा करण्याचा मानस अध्यक्ष पोतदार यांनी व्यक्त केला.
शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक नेते पी. के. पाटील, दिलीप बच्चे, रवींद्र नागटिळे, उपाध्यक्ष अरुण पाटील, बजरंग लगारे, राजमोहन पाटील, संभाजी बापट, शिवाजी पाटील, साहेब शेख, नामदेव रेपे, गणपती पाटील, अण्णासाहेब शिरगावे, प्रसाद पाटील, धोंडीराम पाटील, बाजीराव कांबळे, लक्ष्मी पाटील, सुरेश कोळी, सुमन पोवार, ॲड. संदीप पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी शाखाधिकारी सुभाष पांडव उपस्थित होते.
फोटो ओळी : प्राथमिक शिक्षक बँकेच्या शिरोळ शाखा उद्घाटन व डीआर सेंटर प्रारंभ या कार्यक्रमात दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रशांतकुमार पोतदार, अमरसिंह पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-२७०६२०२१-कोल-शिक्षक बँक)