कोल्हापूर : महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीत रोज कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व तब्बल ४० वेळा रक्तदान केलेल्या तरुणाच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून येथील देवकर पाणंदमधील सर्व मंडळांनी शनिवारी वेगळीच बांधिलकी जपली. निमित्त होते ‘लोकमत’तर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे. या शिबिरात तब्बल ७५ जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये १५ महिलांचाही समावेश होता.
देवकर पाणंदमधील सर्व मंडळांमार्फत राजलक्ष्मीनगरातील वीर सावरकर सभागृहात हे शिबिर झाले. त्याचे उद्घाटन स्मशानभूमीतील कर्मचारी हिंदुराव सातपुते, तुलसीदास कांबळे, अनिल चौगुले व ४० वेळा रक्तदान करणारे श्रीकांत पुरोहित यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करून झाले. या परिसरातील सर्वच मंडळांनी शिबिर होणार, असे फलक लावून लोकांना रक्तदानाचे आवाहन केले होते. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील, शास्त्रज्ञ प्रा. आर. जी. सोनकवडे, ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण उपस्थित होते. उपक्रमाचे आयोजन वीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष इंद्रजित साळोखे, मिलिंद पाटील, सुधीर राणे, दिग्विजय मगदूम, राजेश कोगणूळकर, महेश सावंत, संग्राम पाटील, नीलेश निकम, विश्र्वेश कुलकर्णी, विनायक पाटील, अक्षय जाधव, राजू सूर्यवंशी, पृथ्वीसिंग राजपूत, अमर खडके, प्रेमराज हेगडे यांनी हिरीरीने केले.
१००७२०२१-कोल-राजलक्ष्मीनगर रक्तदान
कोल्हापुरातील देवकर पाणंद परिसरातील सर्व मंडळांनी एकत्रित येऊन शनिवारी ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर घेतले. त्याचे उद्घाटन पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले.