घन:शाम कुंभार- यड्राव -इचलकरंजी परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या काही युवकांना गुन्हेगारीच्या जाळ्यात ओढण्यात आले असून, त्यांच्याकडून विविध प्रकारचे गुन्हे करवून घेतले जात आहेत. युवकांचे हे प्रकार सुसंस्कृत व प्रतिष्ठित असलेल्या पालकांना समजल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. मुलांना जाब विचारला, तर संबधितांकडून बदनाम होण्यास व खंडणीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मुलांचे भवितव्य घडवायचे, की आपली प्रतिष्ठा जपायची, या दुहेरी पेचात काही पालक अडकले आहेत. पालकांनी मुलांच्या भवितव्यासाठी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, अन्यथा मुलांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्हच राहील. अशा प्रकारामुळे गुन्हे विस्तार रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.इचलकरंजी परिसरातील आजूबाजूच्या गावांतील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेले काही युवक गुन्हेगारी क्षेत्रात ओढले गेले आहेत. या युवकांकडून खंडणी उकळण्याचे, अमली पदार्थ तस्करीचे, दुचाकी चोरी, हाणामारी, दहशत निर्माण करणे, यासारखे अनेक गैरमार्ग हाताळले जात आहेत.या कुसंगतीने मुले व्यसनी बनली आणि त्याचे पालकांसमोर प्रदर्शन घडले. रात्रीअपरात्री मुले घरी येण्याचे गमक पालकांना उमगल्यामुळे त्यातील गांभीर्यता लक्षात आली. आपली मुले गुन्हेगारी क्षेत्रात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुलांच्या मित्रांना त्यांनी विश्वासात घेतल्याने मुलाचे अनेक कारनामे ऐकून पालकांचे धाबे दणाणले. एवढ्या लहान वयात गुन्हेगारी क्षेत्राच्या गाढ विळख्यात मुले सापडली कशी, असा त्यांना प्रश्न पडला. मुले गुन्हेगारीत अडकली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न पालकांकडून झाला, तर बदनामी व खंडणीसारखे प्रसंग उद्भवू शकतात. प्रतिष्ठा झाकण्यासाठी एकाने तयारी केली, तर इतर पालकांनाही आर्थिक व मानसिक छळ सहन करावा लागू शकतो. मुलांचे भवितव्य बिघडू द्यायचे नसेल, तर पालकांनी याविरोधी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा, मुलांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्हच राहील. हा प्रकार पोलिसांपुढे आव्हान आहे. त्यास कसे ते सामोरे जातात यावर या युवा पिढीचे भवितव्य अवलंबून आहे, अन्यथा गुन्हेगारी क्षेत्राच्या विस्ताराचा फटका आणखी इतर महाविद्यालयीन युवकांना बसण्याची शक्यता जोर धरत आहे.पोलीस सूत्रधारापर्यंत पोहोचणार कधीटोळ्याअंतर्गत या युवकांची विभागणी झाल्यामुळे एका टोळीतील युवकांचा गुन्हा रात्री-अपरात्री पोलिसांना बाहेर कोठेतरी बोलावून उघड करण्याची पद्धत दुसऱ्या टोळीने अवलंबली आहे. यातील बऱ्याच घटना त्यामध्ये सहभागी असलेल्यांकडूनच पोलिसांपुढे उघड झाल्या आहेत. बऱ्याच गुन्ह्यांची कल्पना पोलिसांना असूनही सूत्रधारापर्यंत कसे पोहोचले नाहीत, त्यांना जरब का बसविली नाही, हा पालकांपुढे प्रश्न उभा राहिला आहे.
महाविद्यालयीन युवक गुन्हेगारीच्या जाळ्यात
By admin | Updated: June 12, 2015 00:48 IST