कोल्हापूर : शासनाकडून परवानगी मिळेपर्यंत दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याबाबत व्यापारी संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार कापड, सराफ व्यापाऱ्यांनी मंगळवारी त्यांची दुकाने बंद ठेवली. मात्र, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, आदी परिसरातील काही ठिकाणी दुकानांचे अर्ध शटर उघडून उत्पादनांची विक्री सुरू होती. महापालिका आणि महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील ४२ गावांमधील सर्व दुकाने सुरू ठेवण्याच्या मागणीबाबत राज्य शासन कोणता निर्णय घेणार याकडे कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
व्यापारी संघटनेने केलेल्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. त्याला मंजूर मिळावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. दरम्यान, व्यापारी संघटनांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील महाद्वार रोड, लक्ष्मी रोड, राजारामपुरी, आदी परिसरातील कापड, तर गुजरीतील सराफ व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने मंगळवारी बंद ठेवली. राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, महापालिका परिसर आदी ठिकाणी दुपारी चारपर्यंत अर्ध शटर उघडून, तर काही ग्राहक आल्यानंतर शटर उघडून त्यांना उत्पादनाची विक्री केली. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सुरू होती. बंद असलेल्या दुकानांच्या दारांसमोर फळे, भाजी विक्रेत्यांचे स्टॉल लागले होते.
चौकट
‘महाराष्ट्र चेंबर’चे मुख्यमंत्र्यांना पत्र
व्यापाऱ्यांची सद्य:स्थिती आणि त्यांची बिघडलेली मानसिकता लक्षात घेऊन दुकाने सुरू करण्याबाबत खास बाब म्हणून कोल्हापूर शहर व प्राधिकरणाची गावे मिळून स्वतंत्र प्रशासकीय घटक तसेच इचलकरंजी शहर स्वतंत्र प्रशासकीय घटक अशी मान्यता तत्काळ द्यावी, अशी विनंती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचे पत्र मंगळवारी पाठविले आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र चेंबर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
प्रतिक्रिया
कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी केलेल्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने दुकाने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला आहे. त्याला मंजूर मिळावी यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. मंजूर मिळाली तर ठीक, अन्यथा आम्ही शहरातील सर्व दुकाने गुरुवारपासून सुरू करणार आहोत.
-संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स
फोटो (२९०६२०२१-कोल-दुकान, ०१, ०२) : कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार मंगळवारी लक्ष्मी रोड येथील कापड व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२९०६२०२१-कोल-दुकान ०३) : कोल्हापुरात मंगळवारी छत्रपती शिवाजी मार्केटमधील अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवेतील दुकाने सुरू होती. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२९०६२०२१-कोल-दुकान ०४) : कोल्हापुरात मंगळवारी महापालिका परिसरातील बंद असणाऱ्या दुकानांच्या दारामध्ये भाजी, पान विक्रेत्यांचे स्टॉल लागले होते. (छाया : नसीर अत्तार)