सोळांकूर : राधानगरी तालुक्यातील पनोरी येथील दोन जिवलग मित्रांचा काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. विठ्ठल ज्ञानू शिंदे (वय४७) व सुरेश धोंडीराम भोसले (वय४५) अशी त्यांची नावे आहेत. काल सायंकाळी दोघे शेताकडे गेले होते. घरी येताना कालव्यात पाणी पिण्यासाठी गेले असता पाय घसरून दोघेही कालव्यात पडले. दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विठ्ठल हा अंध होता तर सुरेश हा सामाजिक कार्याबरोबर मिळेल ते काम करीत होता. दोघांची अनेक वर्षांची जिवलग मैत्री होती. त्यांच्या आकस्मिक मृत्यूचा ग्रामस्थांच्या मनाला चटका लागला असून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.
अंध विठ्ठल सोबत सुरेश कायम असायचा, बाहेर जाताना नेहमी दोघे असायचे. काल शनिवारी दोघे शेताकडे गेले होते. येताना जवळच्या कालव्यात हात-पाय धुण्याबरोबर पाणी पिण्यासाठी उतरत असताना पाय घसरून कालव्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले व बुडून मृत पावले. दोघांच्या घरच्यांनी रात्र झाली तरी ते परत न आल्यामुळे शोधाशोध सुरू केली. ग्रामस्थांना बातमी कळताच सर्वांनी कालव्यात बुडाल्याचा अंदाज करून कालव्याचे पाणी बंद करून शोध सुरू केला. पहाटे चारच्या सुमारास विठ्ठल यांचा मृतदेह आढळला तर आज सकाळी दहाच्या सुमारास सुरेश यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेहाचे पंचनामे केल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले.
अंध विठ्ठल हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ, भावजय पुतणे असा परिवार आहे. तर सुरेश हा गावात सामाजिक बांधिलकीतून विनामोबदला स्वच्छतेची कामे करीत होता. तसेच गावात मिळेल ती कामे करून उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, आई असा परिवार आहे. कायम एकमेकांसोबत असणार्या दोन मित्रांचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावासह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.