कोल्हापूर : शहरातील ‘ए’ आणि ‘बी’ वार्डातील पिण्याचा पाणीपुरवठा ऐन पावसाळ्यात विस्कळीत झाला आहे. शिंगणापूर पाणी योजनेतील वीज पंपात बिघाड झाल्याने अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पंप दुरुस्त होण्यासाठी आणखी चार ते पाच दिवस लागणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल, असे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे जलअभियंता अजय साळुंखे यांनी सांगितले. पाणीपुरवठा विस्कळीत झाला तरी एक दिवसाआड पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असल्याचाही दावाही त्यांनी केला.
शहरातील बहुतांशी भागाला शिंगणापूर पाणी योजनेतून पाणीपुरवठा होतो; पण विद्युत प्रवाह कमी-जास्त होत असल्याने शिंगणापूर योजनेतील चारपैकी दोन पंप बंद पडले होते. यापैकी एक पंप दुरुस्त झाल्याने काही प्रमाणात पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. दोन पंपांवरही पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन शुक्रवारपासून ‘ई’ वार्डात एक दिवसाआड पाणीपुरवठा करीत आहे. एक दिवसाआड असला तरी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी तीव्र पाणीटंचाई निर्माण होत नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. याउलट ‘ई’ वार्डातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी राजारामपुरी, सम्राटनगर, शास्त्रीनगर, एचएससी बोर्ड परिसर, राजेंद्रनगर परिसरातील रहिवाशांच्या आहेत.