कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक मोहिमेत ९८ डेंग्यूसदृश व ३३ चिकनगुनियासदृश रुग्ण आढळले. दि. १ ते ३० नोव्हेंबरअखेर ही मोहीम राबविण्यात आली.
नोव्हेंबर महिन्यातील या मोहिमेत ५९३१ घरांतील कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले तेथे औषध फवारणी, धूरफवारणी करण्यात आली तसेच दूषित कंटेनर आढळलेल्या ३८० ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले.
यापुढे ही मोहीम अधिक गतीमान केली जाणार असून डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेमध्ये डास अळी सर्वेक्षण औषध फवारणी व धूरफवारणी तसेच टायर जप्ती मोहीम व शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बांधण्याचे काम कोल्हापूर महानगरपालिकेने हाती घेतले आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा, टायर्स, नारळाच्या करवंट्या, फुटके डबे आशा वस्तूंचा त्वरित नायनाट करून डेंग्यू, चिकनगुनियावर नियंत्रित ठेवण्यास मदत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना डेंग्यू, चिकनगुनियाची लक्षणे आढळल्यास संबंधितांनी त्वरित महापालिका आरोग्य विभाग अथवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.