इचलकरंजी : येथील टाकवडे वेस परिसरातील पी. बा. पाटील मळ्यात अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत नाही तसेच पाईपलाईन बदलण्याचे कामही बंद आहे. पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होत असल्यामुळे नगरसेविका दीपाली बेडक्याळे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील नागरिकांनी आंदोलन करत नगराध्यक्षांच्या दालनात ठिय्या मांडला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतरच नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.
शहरातील टाकवडे वेस परिसर व पी. बा. पाटील मळ्यात लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या भागात पाणीपुरवठा होत नाही. पाणी आलेच तर अत्यंत कमी दाबाने येते. सध्या जुनी पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, काही महिन्यांपासून हे कामही बंद करण्यात आले आहे. नगरपालिकेकडे सातत्याने मागणी करूनही हा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी नगराध्यक्षांच्या दालनात दीड तास ठिय्या मांडला. नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिल्यानंतरच नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, संजय बेडक्याळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळी
२६०३२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीतील पी. बा. पाटील मळा परिसरातील नागरिकांनी पाण्यासाठी नगराध्यक्ष दालनात ठिय्या आंदोलन केले.