कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने मंगळवारी सुधाकर जोशी नगरात सर्वेक्षणावेळी व्याधीग्रस्त नागरिकांची वॉक टेस्ट, स्वॅब घेण्याचे काम सुरू असताना ज्येष्ठ नागरिकांनी असहकार्य केले. ही बाब प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना समजताच त्यांनी नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर २९ नागरिकांनी पुढे येऊन चाचणी करून घेतली.
प्रशासक बलकवडे या स्वत: सुधाकर जोशी नगरात जाऊन नागरिकांना महापालिका आपल्या सुरक्षितेसाठी वॉक टेस्ट व स्वॅब घेत आहे. तुमच्या आरोग्यासाठीच ही मोहीम आहे. त्यामुळे आपण सर्वांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन केले. सर्व्हेमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णावर तातडीने औषधोपचार, हॉस्पिटलची सुविधा देता येईल हा या मोहिमेचा उद्देश आहे. उपचार लवकर झाल्यास कोणताही रुग्ण गंभीर होणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यानंतर नागरिकांनी मोहिमेला प्रतिसाद दिला.
महापालिकेच्या वतीने दि. २३ मे पर्यंत शहरात संजीवनी अभियान राबविण्यात येत असून व्याधीग्रस्त व्यक्तींना लक्षणे येण्यापूर्वी व कोविडचे संक्रमण होण्यापूर्वी त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या सर्वेक्षणात नागरिकांची वॉकटेस्ट घेऊन आलेल्या निष्कर्षावर वैद्यकीय उपचार केले जात आहेत.
१८५० जणांची तपासणी, एक पॉझिटिव्ह
महापालिकेच्या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मंगळवारी ७५ वैद्यकीय पथकांनी २०४४ व्याधीग्रस्त नागरिकांचे सर्वेक्षण केले. यावेळी १८५० व्याधीग्रस्त नागरिकांची वॉक टेस्ट घेण्यात आली. त्यात कोविडसदृश लक्षणे असणारे ६० नागरिक आढळून आले. त्याचबरोबर २९५ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. २९ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी एक व्यक्ती पॉझिटिव्ह व २८ निगेटिव्ह आले. तर उर्वरित २६६ जणांची आरटीपीसीआर तपासणी केली आहे.
- ऑक्सिजन प्लॅान्टचे काम तातडीने पूर्ण करा
प्रशासक बलकवडे यांनी मंगळवारी आयसोलेशन हॉस्पिटल येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांन्टच्या कामाची पाहणी केली. याठिकाणी ऑक्सिजन प्लांन्टसाठी सिव्हिल वर्कचे, इलेक्ट्रिकचे काम व जनरेटरच्या रुमचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना शहर अभियंता नारायण भोसले यांना दिल्या. यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, साथरोग अधिकारी डॉ. रमेश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे, सहायक विद्युत अभियंता चेतन लायकर, पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडित उपस्थित होते.
(फोटो देत आहे)