जयसिंगपूर : गुजरातच्या वनतारा हत्ती केंद्रातील पथक नांदणी (ता. शिरोळ) येथे येणार असल्याचा समज झाल्याने गुरुवारी रात्री नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या निशिधी येथे हजारोंच्या संख्येने समाजबांधव व नागरिक दाखल झाले. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले होते.कोणत्याही परिस्थितीत आम्ही हत्तीला नेऊ देणार नाही, अशी भावना व्यक्त करीत जमावाने आक्रोश व्यक्त केला. आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजता मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.नांदणी (ता. शिरोळ) येथील प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी, मठाकडे पूर्वाधीकाळापासून हत्ती आहे. एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदविले होते.
या पार्श्वभूमीवर हत्ती केंद्राचे पथक गुरुवारी रात्री हत्तीला नेण्यासाठी येणार आहे असा समज झाल्याने, निशिधी समोर तीन ते चार हजार नागरिक जमा झाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हत्तीला नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली . आज, शुक्रवारी होणाऱ्या मूक मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हत्ती बचाव कृती समितीने केले आहे.
आज सुनावणीत्यानुसार नांदणी येथील ‘महादेवी हत्तीण’ला गुजरात येथे दोन आठवड्यात पाठविण्याचे परवानगी दिली आहे. मात्र, नांदणी मठाने सुप्रीम न्यायालयात धाव घेऊन हत्तीण नांदणी मठाकडे राहण्यासाठी मंगळवारी याचिका दाखल केली आहे. यावर आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
चंदगड, खानापूर यासह अन्य भागांत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात जंगली हत्ती नुकसान करतात. यांना पकडण्याऐवजी व १२०० वर्षांची परंपरा असलेल्या नांदणी मठाचा हत्ती यांना का हवा आहे. वेगवेगळी कारणे देऊन आमचा हत्ती व वनतारा केंद्राकडे पाठविण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . -स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी