चिपळूण : माजी खासदार कै. गोविंदराव निकम यांचा हात धरून डॉ. तानाजी चोरगे राजकारणात, सहकारात आले. सुवर्णमहोत्सवी वर्षी बँकेचे अध्यक्ष व्हावे, अशी निकम यांची इच्छा होती. परंतु, चोरगे त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वत: अध्यक्ष झाले. या घटनेचे दु:ख निकम यांना झाले. या धक्क्यातून ते सावरले नाहीत. अशा चोरगे यांनी नीतिमत्तेच्या गोष्टी आपल्याला शिकवू नयेत, असा घणाघाती आरोप चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी केला. शासनाच्या एजन्सीऐवजी खासगी एजन्सीद्वारे बँकेतील नोकरभरती करणाऱ्यांनी आता चौकशीसाठी तयार राहावे, असे आव्हानही त्यांनी दिले.गेले काही दिवस कदम आणि चोरगे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. प्रथम कदम यांनी बँकेतील नोकरभरतीमध्ये आर्थिक देवघेव झाल्याचा आरोप केला. त्याला उत्तर देताना डॉ. चोरगे यांनी रमेश कदम यांच्या कर्जप्रकरणावर बोट ठेवले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रमेश कदम यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन चोरगे यांच्यावर बेछूट आरोप केले.विद्यार्थ्यांना कर्ज, सिंचन गट, भाजीपाला गटाची माहिती, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग यांचे नोकरभरतीबाबतचे पत्र, अशी काही कागदपत्रेही त्यांनी यावेळी सादर केली. नोकरभरतीबाबत आपण काही संचालकांवर आरोप केले होते. त्यात तथ्य आहे की नाही, हे संपूर्ण जनतेला माहीत आहे. उलट चोरगे यांनी ते आरोप आपल्यावर ओढवून घेतले, हे दुर्दैव आहे. आपल्या कर्जाबाबत त्यांनी उल्लेख केला. आपण कर्ज घेतले होते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, आपल्याला अटक वगैरे काही होणार नव्हती. आपला कोणताही धनादेश न वटता परत आला नव्हता. आपल्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नव्हती. कर्जमाफीचा लाभ इतर शेतकऱ्यांप्रमाणे मला मिळाला. त्यामुळे चोरगे धादांत खोटे बोलत आहेत, असा दावा कदम यांनी केला.बँकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. असे असताना जाहीरपणे बेछूट आरोप करण्यापेक्षा बंद खोलीत यावर चर्चा झाली असती, असे मत चोरगे यांनी मांडले आहे. यावर बोलताना कदम म्हणाले की, पक्षाचा येथे काही संबंध नाही. पक्षाचे पॅनल करताना पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतले जाते. उमेदवाराची निवड करताना पार्लमेंटरी बोर्ड असते. परंतु, बँक ही आपली खासगी प्रॉपर्टी आहे, असे समजून आपल्या मर्जीतील उमेदवार देऊन चोरगे यांनी सावधगिरी बाळगली आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. बँकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. चिंचनाका येथे बँकेच्या शाखेसाठी जागा घेतानाही आर्थिक लाभ झाला आहे. ते प्रथम जाहीर करा. नोकरभरतीसाठी मी चार नाही, तर केवळ एका गरीब मुलीचे नाव सुचवले होते. नोकरभरती प्रक्रिया बोगस आहे. ज्या कंपनीच्या नावे ही परीक्षा घेण्यात आली, ती निबेर एजन्सी शासनमान्य नाही. शासन स्तरावर एमकेसीएल व एचबीपीएस या दोन शासनमान्य एजन्सीद्वारे भरती प्रक्रिया व मुलाखती घेतल्या जातात. चोरगे यांनी ही बेकायदेशीर प्रक्रिया राबवून पेन्सिलने पेपर लिहून भ्रष्टाचार केल्याचा आरोप कदम यांनी केला. रितसर भरती झाली होती, तर मग संचालकांचे नातेवाईक कसे नोकरीला लागले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सह्याद्री शिक्षण संस्थेत नोकरीला लागलेला प्राध्यापक शेकडो एकर जमीन, बंगला, स्वत:चे महाविद्यालय कसे उघडू शकतो, असा प्रश्नही यावेळी कदम यांनी उपस्थित केला. ७०० एकरवर भाजीपाला करण्यासाठी बँकेने कर्जपुरवठा केला. एवढा भाजीपाला पिकला असेल तर चिपळूणमध्ये बाहेरून भाजीपाला येण्याची गरज नव्हती. मांडकी येथील चार बचत गटांसाठी पालवण शाखेतून कर्ज देण्यात आले. त्यासाठी चोरगे यांचीच जमीन दाखवण्यात आली. अनुदान लाटण्यासाठी असे प्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. संचालकांचा हा खरा चेहरा समोर यावा, यासाठी आपला प्रयत्न आहे. असे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत. ते टप्प्याटप्प्याने जनतेसमोर आणू, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्हा बँक म्हणजे एक रॅकेट...रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत एक रॅकेट तयार झाले आहे. हे रॅकेट येत्या निवडणुकीत जनता उधळून लावेल. शिक्षकांचे पगार, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार येथे होतात, म्हणून ही बँक फायद्यात दिसते. एनपीएसुद्धा अॅडजेस्टमेंट करून शून्य दाखवतात. मात्र, वस्तुस्थिती फार वेगळी आहे. जनतेने याची काळजी घ्यावी, असे कदम म्हणाले. कोणीही अधिक कावकाव करू नये. केलीच तर अजून १७-१८ फाईल्स माझ्याजवळ आहेत. तुमचे हे सर्व व्यवहार जनतेसमोर उघडे करीन.- रमेश कदमते पैसे कोणाच्या खिशात गेले?अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक पीक कर्ज देताना महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी यांना ते दिले आहे. त्यांचे नाव, पत्ते कोणते? त्यांना १०० टक्के कर्जमाफी मिळाली कशी? यातील बरेचजण सातारा, सांगली, कोल्हापूर येथील आहेत. स्थानिक शेतकरी नाहीत. मग हे पैसे कोणाच्या खिशात गेले? असा प्रश्नही कदम यांनी केला. परदेश दौरेही शेतकऱ्यांच्या पैशातूनच झाले आहेत. त्याची बिले बँकेला लावली गेली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.रमेश कदम म्हणतात...विद्यार्थ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या नावावर बोगस कर्जपुरवठा प्राध्यापक म्हणून आलेल्या माणसाकडे एवढी संपत्ती आली कुठून? बचत गटासाठी स्वत:च्या जमिनी दाखवून बचत गटाला कर्जपुरवठा केला व त्याचे भाडे स्वत:च घेतले राष्ट्रवादीशी चोरगे यांचा काय संबंध? पक्षासाठी त्यांचे योगदान काय?नोकरभरती प्रक्रिया शासनाच्या धोरणानुसार झालेली नाही
चोरगे यांनी निकम यांच्याच पाठीत खुपसला खंजीर
By admin | Updated: April 8, 2015 00:36 IST