कोडोली : येथे सोमवारी दुपारी देवदर्शनानंतर घरी परतताना मारुती मंदिरनजीक महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना नागरिकांनी चोप देत कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिले. अमर सदाशिव कदम (वय ३१), शिवाजी सिदू लोहार (३४, दोघेही, रा. पेठवडगाव, ता. हातकणंगले) अशी चोरट्यांची नावे आहेत. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. कोडोली येथील वैशाली मतसागर व सुशीला चौगुले या दोघी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने कोठेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत असताना मारुती मंदिर ते चव्हाटा रस्त्यादरम्यान कोडोलीतील छत्रपती चौकातून चव्हाटाकडे टीव्हीएस स्पोर्टस् मोटारसायकलवरून जात असताना चोरटा अमर याने समोरून चालत येत असलेल्या या दोन महिलांपैकी सुशीला प्रभाकर चौगुले यांच्या गळ्यातील मंगलसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चौगुले या दक्ष असल्यामुळे त्यांनी तत्काळ गळ्यात हात घातला. चोरट्यांचा हात चौगुले यांच्या हातात आल्याने त्यांनी धाडसाने त्याचा हात पकडला. त्यामुळे मोटारसायकलवरील दोघेही जाग्यावरच पडले. गाडीवर मागील बाजूस बसलेला अमर सदाशिव कदम हा पळून गेला, तर मोटारसायकल चालक लोहार याचा पाय गाडी खाली अडकल्याने तो पळून जात असता या दोघी महिलांनी त्याचा पाय ओडून धरला व आरडाओरडा केला. त्यावेळी आजूबाजूच्या महिला तसेच नागरिक मदतीला धावून आले. दुसरा चोरटा अमर कदम हा पळून गेला. महिलांनी दंगा केल्याने अभिजित रोकडे, अशोक आंबी, प्रसाद देशपांडे यासह अन्य नागरिकांनी त्याचा पाठलाग करून कोळी गल्लीत कदमला पकडले. या दोन्ही चोरट्यांना चव्हाटा येथे नागरिकांनी आणले व बेदम चोप दिला. या दोघा चोरट्यांना कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी क ोडोली पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद मेमाने करीत आहेत. यापूर्वी चेनस्नॉचिंगच्या घटना वारणा कोडोली परिसरात घडल्या आहेत. त्यांचाही या निमित्ताने उलगडा होण्याची शक्यता आहे.
कोडोली येथे चोरट्यांना चोप
By admin | Updated: August 18, 2015 01:09 IST