कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामधील (सीपीआर) नवजात बालक विभागामध्ये शस्त्रक्रिया न झाल्याने तीन महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. रिया नीलेश पोवार (रा. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) असे मृत बालिकेचे नाव आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न केल्यानेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप रियाचे मामा बजरंग पाथरवट (रा. सायबर चौक, कोल्हापूर) यांनी पत्रकारांसमोर बोलताना केला.याबाबत बजरंग पाथरवट म्हणाले, सुमारे तीन वर्षांपूर्वी वैभववाडीतील नीलेश पोवार यांच्याबरोबर बहिणीचा विवाह झाला. तिला पहिलीही मुलगीच असून, रिया ही दुसरी मुलगी झाली आहे. रियाला दोन महिन्यांपूर्वी सीपीआरमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल केले असता त्यावेळी दोन शस्त्रक्रिया करण्याचे सांगितले. त्यानुसार नवजात विभागाचे डॉक्टर डॉ. शिवप्रसाद हिरुगडे यांनी पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यानंतरची दुसरी पित्ताशय गाठीची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने डॉक्टरांनी अजून काही दिवस येथेच ठेवावे, असा सल्ला नातेवाइकांना दिला होता. दरम्यानच्या कालावधीत डॉ. हिरुगडे यांची बदली झाली. मात्र, परिस्थिती गरिबीची असल्याने खासगी रुग्णालयाकडे गेलो नाही. त्यामुळे येथेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान, शुक्रवारी दुपारी रिया पोवार हिचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताच पोवार, पाथरवट यांचे नातेवाईक सीपीआरमध्ये जमले. त्यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार झाला असल्याचा आरोप केला. रियाचे वडील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात.बालिकेची शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची व अवघड होती. यासाठी तज्ज्ञ डॉक्टर बोलवून व महागडी औषधे देवून तिच्यावर उपचार केले होते.- डॉ.विजय कसा, राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालय,कोल्हापूर.
शस्त्रक्रिया न झाल्याने बालिकेचा मृत्यू
By admin | Updated: February 13, 2015 23:48 IST