कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी भाजपचे राहुल चिकोडे व महाराष्ट पर्यटन विकास महामंडळाच्या शासननियुक्तसदस्यपदी जिल्हा सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांची महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. रामभाऊ चव्हाण यांचे चिरंजीव अजित यांची पुणे ‘म्हाडा’वर तर प्रवीण सावंत यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर ‘शासन नियुक्त’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राहुल चिकोडे, विजय जाधव हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे बिनीचे शिलेदार असल्याने त्यांना या पदावर संधी मिळाली.
निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या नेमणुकी झाल्या आहेत. राहुल चिकोडे यांनी दिवंगत भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले. त्या माध्यमातून एक संघटन तयार केले. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ते भाजपमध्ये सक्रिय असून पालकमंत्री पाटील यांचे ‘विश्वासू कार्यकर्ते’ म्हणून ओळखले जातात. नवऊर्जासह विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने त्यांना ही संधी मिळाली.विजय जाधव हे गेल्या २० वर्षांपासून पक्षात सक्रिय आहेत. जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. सध्या ते मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता कक्षाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. अनेक सामाजिक विषयांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते आंदोलनाच्या माध्यमातून सक्रीय आहेत.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिफारस केल्यानुसार या सर्व नावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली असून लवकरच शासन आदेश निघणार आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी अरुण इंगवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, भाजपची सत्ता येऊनही त्यांना अध्यक्षपदाने हुलकावणी दिली होती.
या पार्श्वभूमीवर दीड महिन्यांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी इंगवले यांना मोठे पद देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर हातकणंगले नगरपालिका मंजूर करण्याबरोबरच आता इंगवले यांना खनिकर्म महामंडळाचे संचालकपद देऊ केले आहे. महाराष्ट्रातून या मंडळावर चार संचालक असून पश्चिम महाराष्ट्रातून इंगवले हे एकमेव संचालक आहे. राज्यातील सर्व खनिकर्म उत्खननांबाबत हे महामंडळ निर्णय घेत असते. नागपूर येथे महामंडळाचे मुख्य कार्यालय आहे.
अजित चव्हाण हे भाजप नेते दिवंगत रामभाऊ चव्हाण यांचे ज्येष्ठ चिरंजीव असून ते साईभक्त रुग्णवाहिकेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. रामभाऊ चव्हाण यांच्या निधनानंतरही त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासोबत काम सुरू ठेवले. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी त्यांना पुणे ‘म्हाडा’वर संधी दिली आहे. प्रवीणसिंह सावंत हे भुदरगड तालुक्यातील असून ते चंद्रकांत पाटील यांच्या ‘निकट’चे समजले जातात. पाटील यांनीच त्यांना शिवसेनेतून भाजपमध्ये आणले होते.