गडहिंग्लज : तीन आठवड्यांपूर्वी बसर्गे येथे महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या तपासाची चक्रे दोन दिवसांपासून अधिक गतिमान झाली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडहिंग्लजमध्येच तळ ठोकला आहे. गुन्ह्यात वापरलेल्या निळ्या रंगाच्या गाडीसह संशयिताला जेरबंद करण्यासाठी गृहखात्याने प्रयत्नांची शिकस्त चालविली आहे. त्यामुळे संशयित आरोपी लवकरच जेरबंद होईल, अशी चर्चा आहे.१२ जुलै २०१४ रोजी स. ९च्या सुमारास बसर्गे-नौकुड मार्गावरील येणेचवंडी फाट्यावर कॉलेजला जाण्यासाठी थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर निळ्या रंगाच्या चारचाकीतून आलेल्या अनोळखी अंदाजे २५ वर्षांच्या तरुणाने बलात्कार केला. त्यानंतर विविध पक्ष संघटनांसह संस्था, महिला संघटना व युवक संघटनांतर्फे देण्यात आलेल्या निवेदनातून नराधमाच्या अटकेची जोरदार मागणी झाली.याचप्रकरणी २ दिवसांपूर्वी गडहिंग्लज प्रांतकचेरीवर राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्षा अॅड. वर्षा देशपांडे यांचे नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला.२५ जुलै रोजी गडहिंग्लजच्या इफ्तार पार्टीत आठ दिवसांत या प्रकरणाचा छडा लावण्याची ग्वाही जिल्हा पोलीस प्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी दिली होती. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्यामुळेच मोर्चा दडपण्याचा प्रयत्न होऊनदेखील महिला कृती समितीच्या पुढाकाराने आयोजित सुमारे ५ हजारांहून अधिक युवक-युवती आणि सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक रस्त्यावर आले.मोर्चानंतर तपास यंत्रणेने आपली चक्रे वेगाने फिरवली आहेत. गुन्ह्यातील संशयित तरुण व निळ्या रंगाच्या वाहनांची झाडाझडती सुरू आहे. नेमक्या आरोपीला पकडण्याच्या दिशेने पोलिसांची धडपड सुरू आहे. लवकरच त्यास यश येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी दिली.घटनास्थळी दुसऱ्या दिवशी पीडित तरुणीची ओढणी, दप्तर, जेवणाचा डबा, छत्री व आयडेंटी आदी वस्तू सापडल्या होत्या. मात्र, तिचा मोबाईल मिळाला नव्हता. आता तपासाच्या मोहिमेत तो मोबाईल पोलिसांना सापडल्याचे समजते. त्यावरूनदेखील तपासाची चक्रे फिरवली जात आहेत.वरिष्ठांचा तळ गडहिंग्लजमध्येअप्पर पोलीस अधीक्षक एम. एस. मकानदार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, इचलकरंजीचे मानसिंह कुचे आणि गडहिंग्लजच्या टीमचे प्रमुख पो. नि. इंगवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मुक्काम गडहिंग्लजमध्ये आहे. त्यामुळे या गुन्ह्याच्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.झाडाझडती कशाची व कुणाची ?आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या निळ्या रंगाच्या गाडीच्या शोधासाठी आणि पीडित तरुणीच्या माहितीवरून तयार केलेल्या संशयिताच्या रेखाचित्रासह कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यांसह गोवा आणि सीमाभागात पोलीस आरोपीची माहिती घेत आहेत. बसर्गे व पंचक्रोशीतील देखील काही संशयित तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. घटनास्थळी हरविलेल्या ‘त्या’ तरुणीच्या मोबाईलसह तिच्याकडील अन्य वस्तुवरूनही तपास केला जात आहे.‘पीडिता’ची भेट घडवणार का?‘पीडित’तरुणीवर पोलीसच दबाव टाकत असल्याचा आरोप करीत राज्य महिला लोकआयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी तीन दिवसांत गडहिंग्लजमधील महिला चळवळीतील कार्यकर्त्या व पीडित तरुणीची भेट घडविण्याची मागणी केली आहे. ‘ती’ भेट होणार की तत्पूर्वीच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश येणार, याबद्दलही चर्चा सुरू आहे.
तपासाची चक्रे गतिमान
By admin | Updated: August 3, 2014 23:33 IST