कोल्हापूर : एस. टी. गँगच्या साईराज जाधवसह बारा जणांविरोधात संघटित गुन्हेगारीविरुद्ध विशेष मोका न्यायालयात गुरुवारी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.
एसटी गँगच्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांना मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव राजारामपुरी पोलीस ठाणे यांच्याकरवी तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले होते. आजअखेर या गँगच्या सदस्यांवर राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर, जयसिंगपूर, गोकुळ शिरगांव या पोलीस ठाण्यात ४१ विविध दखलपात्र गुन्हे दाखल आढळून आले. त्यानुसार पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यांनी तो विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे सादर केला. त्यास मंजुरी दिली. त्याचबरोबर त्यांनी ६ एप्रिल २०२१ ला शाहू टोलनाक्याजवळ एका हाॅटेल व्यावसायिकावर तलवारसह घातक शस्त्रांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्याचा वाढीव कलमांचा अंतर्भाव करण्यास पूर्वपरवानगी दिली. त्यानुसार अप्पर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांच्याकडे विशेष मोक्का न्यायालयात दोषारोप सादर करण्यास पूर्वपरवानगी मागितली होती. त्यांनी मंजुरीचे आदेश निर्गमित करत दोषारोप विशेष मोक्का न्यायालयात दाखल करण्यास परवानगी दिली. त्यानुसार
या वाढीव गुन्ह्यांत साईराज दीपक जाधव, हृषिकेश ऊर्फ गेंड्या बाबासोा चौगुले, आसू बादशाह शेख, अर्जुन बिरसिंग ठाकूर, नितीन ऊर्फ बाॅबी दीपक गडीयाल, जब्बा ऊर्फ विराज विजय भोसले, पंकज रमेश पोवार, प्रसाद जर्नादन सूर्यवंशी, करण उदय सावंत, विशाल प्रकाश वडर, रोहित बजरंग साळोखे, रामू मुकुंद कलकुटकी आणि विधि संघर्षित बालकाचा समावेश होता. त्यातील बाराजणांचा दोषारोपपत्रात समावेश आहे. हे दोषारोप पत्र शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दाखल केले.