उदगाव : कृष्णा नदीच्या सभोवताली असणाऱ्या गावात मोठ्या प्रमाणात वीट व्यवसाय चालतो. उदगाव परिसरात उदगाव, चिंचवाड येथे व्यावसायिकांनी वीट विक्रीचा धंदा जोमात सुरू केला आहे; परंतु वीटभट्टीसाठी लागणारी माती उपसल्यामुळे नदीपात्राशेजारी मोठमोठे डोह तयार झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
उदगाव (ता. शिरोळ) येथील चिंचवाड रोडजवळ मळी रस्त्यात सात ते आठ वीटभट्टया आहेत. त्यासाठी लागणारी माती व इतर गौण खनिज हे भाड्याने अथवा स्वत:च्या मळीतून घेतले जात आहेत; परंतु तेथील माती वापरत असताना नदीपात्र रुंदावले आहे. लगतच मोठमोठे डोह तयार झाल्याने महापुरावेळी पुराचे पाणी थेट शेतात शिरत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
गतवेळी ३३ हजार ब्रास अवैध माती उत्खनन केल्याप्रकरणी ‘लोकमत’ने आवाज उठविला होता. त्याची दखल घेत पुणे लोकायुक्त यांनी येथील शेतकऱ्यांना साडेदहा कोटींचा, तर चिंचवाड येथील शेतकऱ्यांना दोन कोटींचा दंड ठोठावला होता. काहींनी तुटक स्वरूपात भरण्याची तयारी दर्शविली. हा दंड थेट सातबाऱ्यावर चढल्याने शेतकऱ्यांवर नामुष्कीची वेळ आली आहे. व्यावसायिक मात्र जोमात आहेत. एकंदरीत वीटभट्टी व्यवसायामुळे नदीपात्र व शेजारील शेतांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणून महसूल विभागाने तत्काळ परवानाधारक व विनापरवानाधारक व्यावसायिकांना महसुली दणका देणे गरजेचे आहे.
फोटो - १९०८२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदी पात्राशेजारी माती उत्खननामुळे २५ ते ३० फूट खोल डोह तयार झाले आहेत.