लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापुरातील कोणत्याही जागेवरून आपण निवडून येऊ शकतो; नाही आलो तर थेट हिमालयात जाण्याची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. आता तर १२ वर्षे ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्या पुणे पदवीधर मतदारसंघातून त्यांनीच उभा केलेल्या उमेदवारांचा ५० हजार मतांनी पराभव झाला. आता त्यांनीच ठरवावे, हिमालयात जायचे की आणखी कोठे? अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या संकटात भाजपने दुटप्पी भूमिका घेतली. सुशांतसिंग राजपूत, कंगना प्रकरणात तर महाराष्ट्राचा अपमान केला. मात्र या निवडणुकीतून जनतेने त्यांना चोख उत्तर दिले. त्यांचे बालेकिल्ले ढासळले असून विजय विनयाने स्वीकारला पाहिजे. सत्तेची आणि संपत्तीची मस्ती फार काळ टिकत नाही. माझे आणि चंद्रकांत पाटील यांचे काही बांधाचे भांडण नाही; मात्र सत्तेत असताना ते माझ्याशी सुडाने वागले. राजकीय व सामाजिक जीवनातून मला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चूक कबूल करावी आणि या प्रकरणावर पडदा टाकावा.
-------------------------------------
ईव्हीएम मशीन असते तर...
हसन मुश्रीफ म्हणाले, एकटे-एकटे लढण्याची भाषा आता चंद्रकांत पाटील करीत आहेत. कसे लढायचे ते आम्ही ठरवू. हा निकाल पाहिल्यानंतर ‘ईव्हीएम मशीन असते तर’ असे देेवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी म्हटले असते. तिन्ही पक्षांचे असेच मनोमिलन झाले तर यापेक्षाही चांगले यश मिळेल.
-------------------------------------
राष्ट्रवादी नसती, मंत्री नसतो
हसन मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, हे खरे आहे. शरद पवार यांच्यावरील भक्तीपुढे मला सत्ता महत्त्वाची वाटत नाही. काही नसताना, माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी १६ वर्षे मंत्री केले. कदाचित राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष नसता तर मंत्रीही झालो नसतो.