- संदीप आडनाईक
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : संपूर्ण देशाने रविवारी मध्यरात्री साध्या डोळ्यांनी खग्रास चंद्रग्रहणाच्या विशेष सोहळ्याचा आनंद लुटला. तब्बल ३ तास २९ मिनिटांपर्यंतचे हे ग्रहण म्हणजे आकाशातील एक वेधक आणि दुर्मीळ खगोलीय घटना होती. या ग्रहणादरम्यान खगोल अभ्यासक आणि विज्ञानप्रेमींना चंद्र लालसर आणि तांबूस रंगाचा पाहायला मिळाला. त्याला ‘ब्लड मून’ किंवा ‘रेड मून’ म्हणतात.
कोल्हापुरात पाहिलेला हा २०२५ या वर्षातील दुसरा आणि शेवटचा पूर्ण चंद्रग्रहण होता. पुढील पूर्ण चंद्रग्रहण २०२६ मध्ये दिसणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्रामध्ये येते आणि पृथ्वीची गडद सावली चंद्रावर पडते तेव्हा हे ग्रहण होते. पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश विखुरतो, ज्यामुळे निळा प्रकाश शोषला जातो आणि लाल-नारिंगी रंगाचा प्रकाश चंद्रावर पोहोचतो म्हणून तो लाल दिसतो, अशी माहिती खगोलशास्त्राचे प्रा. मिलिंद कारंजकर यांनी दिली. रविवारच्या रात्री हजारो कोल्हापूरकरांनी आकाशातील हा भव्य आणि दुर्मीळ खगोलीय देखावा आपल्या छतावरून, टेलिस्कोपद्वारे तसेच साध्या डोळ्यांनीही न्याहाळला. पाऊस आणि ढगाळ वातावरण नसल्याने चंद्रावर पृथ्वीची सावली हळूहळू पडताना पाहणे सर्वांना शक्य झाले.
चित्रनगरीसमोर दर्शन खगोलविज्ञानाचे छंद असणाऱ्या काही उत्साही लोकांनी त्यांचे टेलिस्कोप आणून इतरांनाही हा देखावा दाखविला. शहराच्या आग्नेय दिशेला चित्रनगरी प्रवेशद्वारासमोरील मैदानावर उपस्थित समूहासमोर चंद्रग्रहणानिमित्त खगोल अभ्यासक किरण गवळी यांनी समज, गैरसमज, चालीरीती आणि प्रथा या विषयांवर वैज्ञानिक तसेच खगोलशास्त्रीय मार्गदर्शन केले. भूलतज्ज्ञ डॉ. किरण भिंगार्डे यांनी या ग्रहणांचा मानवी शरीरावर तसेच मनावरील परिणामांविषयी मार्गदर्शन केले.
अंबाबाईसमोर श्रीसूक्ताचे आवर्तनचंद्रग्रहण काळात मोक्ष मिळेपर्यंत करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर खुले राहिले. दुपारी १२ वाजता वेधारंभ झाला. या काळात सारंग मुनीश्वर, स्वानंद मुनीश्वर, सचिन ठाणेकर, सचिन गोटखिंडीकर, वेदमूर्ती सुहास जोशी, आशुतोष ठाणेकर यांच्यासह सर्व पुजारी सेवेकरी यांनी देवीसमोर जलाभिषेक करुन श्रीसूक्ताचे आवर्तन केले. ग्रहणमोक्षानंतर श्री देवीस स्नान पूजा होऊन शेष उपचार समाप्तीनंतर शेजारतीने मंदिर बंद झाले. आज, सोमवारी नित्याप्रमाणे पहाटे मंदिर खुले राहणार आहे.
-८:५८ : चंद्राचा पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश-९:५८ : आंशिक ग्रहणास सुरुवात-११:०० खग्रास ग्रहणास सुरुवात-११.४१ : चंद्र संपूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत (कमाल टोक)-१२.२२ : खग्रास चंद्रग्रहणाची सांगता-१.२५ : आंशिक चंद्रग्रहणाची सांगता